Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गुरेघर येथे जंगलात भीषण आग; लाखो रुपयांची वनसंपदा नष्ट
ऐक्य समूह
Friday, April 21, 2017 AT 11:30 AM (IST)
Tags: re3
5पाचगणी, दि. 20 ः गुरेघर (ता. महाबळेश्‍वर) येथील वनसंशोधन केंद्राच्या हद्दीतील व महाबळेश्‍वर वनपरिक्षेत्रातील जंगलाला गुरुवारी लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांची वनसंपदा नष्ट झाली. सकाळी 11 वाजता लागलेली आग सायंकाळी 4 च्या सुमारास आटोक्यात आणण्यात वन कर्मचारी व ग्रामस्थांना यश आले.
पाचगणी-महाबळेश्‍वर मुख्यमार्गावर बोंडारवाडीनजीक महाबळेश्‍वर वन परिक्षेत्रातील जंगलाला सकाळी 11 च्या सुमारास अचानक आग लागली. थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. ही आग वनसंशोधन केंद्राच्या हद्दीत पसरली. अवकाळी, बोंडारवाडी येथील ग्रामस्थ, तरुण व वन कर्मचार्‍यांनी स्थानिक साधनसामग्रीचा उपयोग करून आग आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले; परंतु आगीच्या प्रचंड झळा व उन्हाच्या तीव्रतेमुळे आगीपर्यंत पोहोचणे शक्य होत नव्हते. महाबळेश्‍वर व पाचगणी पालिकेचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाल्यावर बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. काही ठिकाणी जंगलामध्ये वाट नसल्याने अग्निशामक बंब तेथे पोहोचत नव्हते. तेथे उपस्थित युवकांनी जीवाची बाजी लावत हे अग्नितांडव रोखण्यात दुपारी 4 च्या सुमारास यश मिळविले. तोपर्यंत सुमारे तीन हेक्टर क्षेत्रातील वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती.
निहाल बागवान, तपन पोरे, अजय बोरा, महेश बिरामणे, सूर्यकांत कासुर्डे, नासीर शेख, अफजल डांगे, सागर डांगिस्ते, बापू झाडे व ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
आगीची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल एस. डी. कुलकर्णी यांनी सहकार्‍यांसह तेथे धाव घेतली. वनपाल सुनील लांडगे, वनरक्षक सागर कोळी, कार्यालयीन वनरक्षक सहदेव भिसे व कर्मचार्‍यांच्या मदतीने त्यांनी तातडीने उपाययोजना केल्या. आग जंगलात दूरवर पसरू नये म्हणून आणि आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: