Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राज्य मंत्रिमंडळात मे महिन्यात मोठे फेरबदल
ऐक्य समूह
Friday, April 21, 2017 AT 11:20 AM (IST)
Tags: mn2
आशिष शेलार, विजयकुमार गावित यांची वर्णी?
5मुंबई, दि. 20 (प्रतिनिधी) : राज्य मंत्रिमंडळामध्ये येत्या पंधरवड्यात मोठे फेरबदल होण्याची शक्यता असून मागच्या अडीच वर्षांत फारसा प्रभाव दाखवू न शकलेल्या मंत्र्यांना डच्चू देऊन काही नवीन चेहर्‍यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. आशिष शेलार, देवयानी फरांदे, विजयकुमार गावित यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची तर बबनराव लोणीकर, अंबरीशराजे आत्राम, विष्णू सावरा यांना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.
महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करण्यासाठी पक्षनेतृत्वाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परवानगी दिली आहे. पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची पुढील आठवड्यात होणारी बैठक पार पडल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे फेरबदल होण्याची शक्यता आहे. फडणवीस सरकार सत्तेवर येऊन अडीच वर्षे, म्हणजे सरकारचा अर्धा कालावधी पूर्ण झाला आहे. या अडीच वर्षांमधील मंत्र्यांची कामगिरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाच्या विस्तारासाठी झालेला उपयोग या बाबींचा विचार करून मंत्रिमंडळात काही फेरबदल करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासमवेत चर्चा केली होती. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना अनुमती देण्यात आल्याची चर्चा आहे. मंत्री म्हणून दाखवलेला प्रभाव व पक्षकार्य या दोन निकषांनुसार आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, अंबरीशराजे आत्राम, राजकुमार बडोले यांची कामगिरी पाहता त्यांच्या पदांवर गदा येऊ शकेल, अशी चर्चा आहे.
शिवसेनेबरोबरची युती तोडून मुंबई महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न थोडक्यात हुकला असला तरी पक्षाचे संख्याबळ 33 वरून 82 पर्यंत वाढले आहे. त्यामुळे मुंबई भाजप अध्यक्ष आ. आशिष शेलार यांना मंत्रिपदाची बक्षिसी दिली जाण्याची शक्यता आहे. नाशिकच्या देवयानी फरांदे यांचेही नाव चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आलेल्या अन्य पक्षातील नेत्यांना आजवर मंत्री किंवा अन्य कुठले पद देण्यात आलेले नाही. मात्र, यावेळी फेरबदल करताना विजयकुमार गावित किंवा शिवाजीराव नाईक यांची वर्णी लागण्याची शक्यता  व्यक्त केली जात आहे. शिवसेना-भाजपमधील संबंध मध्यंतरी विकोपाला गेले होते; परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला हजेरी लावल्याने दोन पक्षांमधील तणाव थोडासा कमी झाला आहे. त्यामुळे शिवसेना आपल्या हिश्श्याची दोन रिक्त मंत्रिपदे भरतानाच काही फेरबदल करण्याची शक्यता आहे. शिवसेना मंत्र्यांबाबत शिवसेनेच्या आमदारांमध्येच नाराजी आहे. विधानसभेपेक्षा विधानपरिषदेच्याच लोकांना महत्त्व दिले जात असल्याबद्दलही नाराजी व्यक्त होते आहे. त्यामुळे काही बुजुर्गांना विश्रांती देऊन नवीन लोकांना संधी दिली जाण्याची
शक्यता आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: