Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कणूर येथे आगीत शेतकर्‍यांचे तीन लाखांचे नुकसान
ऐक्य समूह
Friday, April 21, 2017 AT 11:25 AM (IST)
Tags: re1
सोनगीरवाडीतील आगीत म्हैस ठार
5वाई, दि. 20 ः कणूर-बावधन (ता. वाई) येथील ओढ्यात लागलेली आग पसरून लगतच्या शेतकर्‍यांच्या कडब्याच्या गंजी, शेती औजारे, झाडे, बैलगाडी असे साहित्य जळून खाक झाले. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या तीन बंबांच्या साह्याने स्थानिक तरुणांनी अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. सकाळी 10.30 च्या सुमारास लागलेली आग दुपारी 2 च्या सुमारास आटोक्यात आणण्यात यश आले. अन्य एका घटनेत सोनगीरवाडी येथे गुरांच्या गोठ्यास सकाळी 11 च्या सुमारास आग लागून गोठ्यासह गाभण म्हैस व शेती औजारे जळून खाक झाली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कणूर येथील बाबीचा ओढ्यात सकाळी 10.30 च्या सुमारास आग लागली. सुमारे 1.5 किलोमीटर परिसरातील ओढा व बाजूच्या परिसरात ही   आग पसरली. आग लागल्याचे समजताच कणूरमधील युवक व ग्रामस्थांनी विहिरीवरील मोटार व बोअरवेलमधील पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. काही युवकांनी धाडसाने कडब्याच्या गंजीलगत बांधलेली पाच-सहा जनावरे सोडवल्याने ती बचावली. दरम्यान, वाई पालिकेचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला. थोड्या वेळाने किसन वीर साखर कारखाना व पाचगणी नगरपालिकेचे बंबही घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक बंबाच्या साह्याने युवकांनी आग आटोक्यात आणली. एका ठिकाणी नांगरलेल्या शेतात बंबाची गाडी पुढे जात नसल्याने युवकांनी धक्का देत गाडी आग लागलेल्या ठिकाणी नेली. सुमारे 2 वाजेपर्यंत संपूर्ण आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत पार्वती गोविंद शिंदे यांची कडब्याची गंज, महादेव मुगुटराव राजपुरे यांचे कळकीचे बेट, शंकर दिनकर राजपुरे यांची सर्व्हिस वायर, मोटरची केबल, पाइप, शशिकांत रामचंद्र राजपुरे यांची कॉपर वायर, पाइप, सर्व्हिस वायर, कळकीचे बेट, आंब्याची झाडे, ड्रेनेज पाइप, तुकाराम केशव राजपुरे यांची आंब्याची व चिंचेची झाडे, शाखाबा बापू राजपुरे यांची कडब्याची गंज, बैलगाडी, शेतीची औजारे, पीव्हीसी पाइप, नारळाची झाडे जळून खाक झाल्याने सुमारे 3 लाखांचे नुकसान झाले. कणूर येथील हरिदास राजपुरे, सचिन राजपुरे, प्रवीण राजपुरे, बाबूराव राजपुरे, दत्तात्रय राजपुरे, संपत राजपुरे व विठ्ठल कृषी ग्रामविकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. तहसीलदार अतुल म्हेत्रे, पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. एस. कदम, हवालदार पी. एच. फरांदे, एस. एस. जाधव, डी. डी. पवार, सूतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, मदन भोसले, नितीन मांढरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ शेलार, नगरसेवक सतीश वैराट, अमजद इनामदार, ग्रामपंचायत सदस्य तानाजी कचरे यांनी घटनास्थळी भेट दिली. मंडलाधिकारी एन. एस. भांदिर्गे व तलाठी सीमा साबणे यांनी या घटनेचा पंचनामा केला.
सोनगीरवाडीत गाभण म्हैस ठार
सोनगीरवाडी (वाई) येथील सोनजाई मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावरील राजेंद्र रामचंद्र सावंत यांच्या रानातील गुरांच्या गोठ्यास सकाळी 11 च्या सुमारास अचानक आग लागली. थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. गोठ्यात बांधलेली गाभण म्हैस, पीव्हीसी पाइप, शेतीची लाकडी औजारे व संपूर्ण गोठा जळून खाक झाला. या आगीत सुमारे 81 हजार रुपयांचे नुकसान झाले. वाई पालिकेच्या अग्निशामक बंबाच्या  साह्याने आग आटोक्यात आणण्यात आली. तहसीलदार अतुल म्हेत्रे, मंडलाधिकारी नवींद्र भांदिर्गे यांनी घटनास्थळी भेट दिली. तलाठी पांडुरंग भिसे यांनी पंचनामा केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: