Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अरुणाचल भारताचा अविभाज्य भाग नामकरणावरून चीनला ठणकावले
ऐक्य समूह
Friday, April 21, 2017 AT 11:24 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 20 (वृत्तसंस्था) : अरुणाचल प्रदेशातील सहा ठिकाणांना प्रमाणित नावे देऊन या प्रदेशावर हक्क सांगण्याच्या चीनच्या खेळीनंतर भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. नावे बदलल्याने अनधिकृतरीत्या कब्जा केलेला भाग कायदेशीर ठरत नाही, असे भारताने चीनला ठणकावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या संदर्भातील भूमिका स्पष्ट करताना कठोर शब्द वापरले.
तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल भेटीमुळे खवळलेल्या चीनने अरुणाचल प्रदेशातील सहा ठिकाणांना अधिकृत ‘प्रमाणित’ नावे दिल्याचे सांगत भारतावर कुरघोडीचा प्रयत्न केला होता. नामकरणाचा हा पहिलाच टप्पा असल्याचेही चीनने म्हटले होते. चीनच्या नागरी कामकाज मंत्रालयाच्या हवाल्याने चिनी प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले होते. चिनी, तिबेटी आणि रोमन वर्णाक्षरांचा वापर करून अरुणाचल प्रदेशातील सहा ठिकाणांची नावे चीनने 14 एप्रिल रोजी बदलल्याचे जाहीर केले होते. व्योग्यानिलग, मिला री, कोइंदोरबो री, मनकुका, बुमो ला व नमकापूब री, अशी ही नावे आहेत.
दलाई लामांच्या भेटीमुळे ही नावे बदलण्यात आली का, याबद्दल चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ल्यू काँग यांना प्रश्‍न विचारण्यात आला असता त्यांनी नेमके उत्तर देण्याचे टाळले होते. चीन सरकार लवकरच दुसरी राष्ट्रीय जनगणना करणार असून त्यामध्ये अल्पसंख्याक भागातील ठिकाणांना प्रमाणित नावे देण्यात येणार आहेत. संबंधित मंत्रालये तिबेटी नावांबाबत आणखी संशोधन करणार आहे. त्यानंतर आम्ही आणखी प्रमाणित नावे जाहीर करू शकू, असे काँगम्हणाले होते. भारत-चीन यांच्यात 3,488 किलोमीटर लांबीच्या सीमेबाबत वाद आहे. अरुणाचल प्रदेश म्हणजे ‘दक्षिण तिबेट’ असल्याचे सांगून या भागावर चीनने दावा केला आहे तर चीनने 1962 च्या युद्धात बळकवलेल्या ‘अक्साई चीन’च्या भागावर आपला हक्क आहे, असा भारताचा दावा आहे. दोन्ही देशांत विशेष प्रतिनिधी पातळीवर सीमा प्रश्‍नावरून चर्चेच्या 19 फेर्‍या झाल्या असून त्यातून तोडगा निघालेला नाही. आता दलाई लामा यांनी अरुणाचल प्रदेशला भेट दिल्याने संतापलेल्या चीनने आपल्या सार्वभौमत्वासाठी आवश्यक पावले उचलण्यात येतील, असा इशारा दिला होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: