Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नागपूरच्या आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
ऐक्य समूह
Friday, April 21, 2017 AT 11:18 AM (IST)
Tags: mn1
दोन नराधमांना अटक; सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर
5नागपूर, दि. 20 (वृत्तसंस्था) : नागपूरच्या आमदार निवासात एका अल्पवयीन मुलीवर तीन दिवस बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून आमदार निवासांच्या कारभाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्याच्या उपराजधानीत आणि मुख्यमंत्र्यांच्या गावातच ही घटना घडल्याने गृह विभागाचेही वाभाडे निघाले आहेत. या प्रकरणी दोन नराधमांना अटक करण्यात आली आहे.
आमदार निवासाच्या तिसर्‍या मजल्यावरील खोली क्रमांक 320 मध्ये 17 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून पीडितेवर अत्याचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणी रजत मद्रे (वय 19) आणि मनोज भगत (वय 44) या दोन संशयितांना अटक केली आहे. आपल्या ुकुटुंबासमवेत भोपाळला फिरायला जायचे आहे, असे सांगून मनोजने मुलीला आपल्यासोबत येण्यासाठी राजी केले. त्यानंतर मनोजने तिला आमदार निवासात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. एवढे करून तो थांबला नाही तर त्याने रजत मद्रे यालाही बोलावून घेतले. त्यानंतर दोघांनीही तिच्यावर पुन्हा बलात्कार केला.
मनोज भगत याचे दागिन्यांचे दुकान असून पीडित मुलगी त्याच्या दुकानात कामाला होती. मनोज हा 14 एप्रिल रोजी सायंकाळी पीडित मुलीच्या घरी गेला. आम्ही सर्व कुटुंबील भोपाळ येथे फिरायला जात आहोत. तुमच्या मुलीलाही सोबत पाठवा, असे त्याने मुलीच्या आईला सांगितले. पीडित मुलीच्या नातेवाइकांनी तिला मनोजसोबत जाण्यास परवानगी दिली. दोघेही घरून निघाले. मात्र, भोपाळला न जाता मनोजने कारमधून तिला आमदार निवास येथे नेले. आमदार निवासाच्या पार्किंगमध्ये कारमध्येच मनोजने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आमदार निवासात 320 क्रमांकाची खोली भाड्याने घेतली. तेथेही त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मनोजने रजतलाही आमदार निवासात बोलावून घेतले. तेथे दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर चार दिवस अत्याचार केला. त्यानंतर 17 एप्रिलला तिला घरी सोडले. 18 एप्रिलला मनोज दारूच्या नशेत पुन्हा मुलीच्या घरी गेला. त्यावेळी पुन्हा मुलीला सोबत भोपाळला न्यायचे असल्याचे त्याने सांगितले. मात्र, मुलीच्या आईने नकार दिला. त्यावर चार दिवस ती कुठे होती हे तुम्हाला माहिती आहे का, असे म्हणून मनोज तेथून निघून गेला. त्यावेळी मुलीच्या आईने तिला याबद्दल विचारणा केली. त्यानंतर मुलगी घरून निघाली. बराच शोध घेऊनही ती सापडली नाही. अखेर तिच्या आईने गिट्टीखदान पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी मुलगी बेपत्ता  असल्याची नोंद केली. संशयाच्या आधारे पोलिसांनी आधी मनोजला ताब्यात घेतले. त्यावेळी पीडित मुलगी रजतसोबत असून आग्रा येथे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पीडित मुलगी आणि आरोपी रजत मद्रे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या घटनेमुळे नागपूर आमदार निवासातील कारभाराचा आणि सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आमदार निवासातील खोल्या या आमदार किंवा वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांच्या चिठ्ठीनेच दिल्या जातात; पण या प्रकरणात आरोपी मनोज भगत याला ही खोली खाजगी व्यक्ती म्हणून देण्यात आली होती. त्यामुळे हा सर्व प्रकार धक्कादायक आहे. आमदार निवासात पोलीस बंदोबस्तही असतो. त्यामुळे पोलिसांनी अल्पवयीन मुलीला आतमध्ये कसे जाऊन दिले, असा सवाल शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्‍हे यांनी उपस्थित केला. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
हजार रुपयांमध्ये मिळते खोली
नागपूर आमदार निवासात शासकीय कर्मचार्‍यांना 100 रुपये प्रति दिवस या दराने खोली भाड्याने देण्यात येते. अन्य नागरिकांना एक हजार ते दीड हजार रुपये दराने खोली देण्यात येते. याशिवाय ‘सेटिंग’द्वारेही दोन तीनशे रुपयांमध्ये काही तासांसाठी आमदार निवासात खोली भाड्याने मिळते. त्याची रजिस्टरमध्ये नोंद होत नाही. मनोजने चौकीदाराला एक हजार रुपये याप्रमाणे चार दिवसाचे चार हजार रुपये दिले होते. त्यामुळे 320 क्रमांकाच्या खोलीच्या कुलपाची किल्लीही त्याच्याकडे होती. याच खोलीत त्याने मुलीवर अत्याचार केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: