Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मनसेतील अस्वस्थता चव्हाट्यावर
ऐक्य समूह
Friday, April 21, 2017 AT 11:21 AM (IST)
Tags: mn3
निराश पदाधिकार्‍यांनी प्रथमच उठवला आवाज
5मुंबई, दि. 20 (प्रतिनिधी) : सततच्या पराभवामुळे निराश झालेल्या मनसे पदाधिकार्‍यांनी आज प्रथमच पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यासमोर आपल्या मनातील खदखद व्यक्त करत त्यांना खडे बोल सुनावले. 2014 पासून पक्षाची अधोगती सुरू असून ती थांबण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नाहीत. पक्षाचे नेमके धोरण, दिशा व कार्यक्रम आम्हालाच कळत नाही तर लोकांना काय सांगणार, अशी थेट टीका काही पदाधिकार्‍यांनी केल्याचे समजते. मात्र, त्यांची अस्वस्थता दूर करण्याऐवजी राज ठाकरे यांनी या पदाधिकार्‍यांची कानउघडणी करताना निवडणुकीत मते मिळोत वा न मिळोत, काहीही झाले तरी मराठीचा मुद्दा मी सोडणार नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितल्याचे समजते. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मात्र बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार झाल्याचे सांगितले.
महापालिकांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांमधील पराभव, पक्षाला लागलेली गळती या पार्श्‍वभूमीवर मनसेची आढावा बैठक राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. विविध मतदारसंघांचा आढावा घेणारा अहवाल राज ठाकरे यांना सादर करण्यात आला. पनवेल, भिवंडी-निजामपूर आणि मालेगाव या महापालिकांच्या निवडणुका 24 मे रोजी होणार आहेत. त्याबद्दलही चर्चा करण्यात आली. या बैठकीत काही पदाधिकार्‍यांनी पक्षाच्या सद्य स्थितीबाबत परखड शब्दात आपली मते मांडल्याचे समजते. पक्षाला ठोस अशी भूमिका नाही. केवळ मराठीचा मुद्दा घेऊन मते मिळत नाहीत. इतर भाषिकांनाही जवळ घ्यायला हवे, असे काही पदाधिकारी म्हणाले. त्यावरून बरीच वादावादी झाली आणि तक्रारी करणार्‍या पदाधिकार्‍यांचीच राज ठाकरे यांनी कानउघडणी केली म्हणे. पक्षाची भूमिका योग्यच आहे; पण तुम्ही ही भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडत असल्याचे राज यांनी पदाधिकार्‍यांना सुनावल्याचे समजते. काहीही झाले तरी मी मराठीचा मुद्दा सोडणार नाही. निवडणुकीत मते मिळोत वा न मिळोत मराठीचा मुद्दा शेवटपर्यंत कायम राहणार असल्याचे राज यांनी पदाधिकार्‍यांना सुनावले. दरम्यान, बैठकीत कोणतीही खडाजंगी झालेली नाही. मनसे पदाधिकार्‍यांनी आपापले अहवाल राज ठाकरे यांना सादर केले. बैठक पूर्णपणे खेळीमेळीच्या वातावरणात झाली. पक्षवाढीसाठी मनसे नेत्यांनी काय करावे, याचे मार्गदर्शन राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये फिरून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मनसेच्या पराभवाचे विश्‍लेषण करण्यात आले आहे. त्यावर विचार करूनच पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: