Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कुलभूषण जाधव यांच्याविषयी चिंता
ऐक्य समूह
Friday, April 21, 2017 AT 11:29 AM (IST)
Tags: na3
भारताची पुन्हा ‘कॉन्सुलर अ‍ॅक्सेस’ची मागणी
5नवी दिल्ली, दि. 20 (वृत्तसंस्था) : कथित हेरगिरी प्रकरणी पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची प्रकृती आणि त्यांचा ठावठिकाणा याबाबत काहीही माहिती नाही. हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी गुरुवारी सांगितले. जाधव यांच्याशी दूतावासामार्फत संपर्क (कॉन्सुलर अ‍ॅक्सेस) साधू द्यावा, अशी मागणी भारताने 15 व्या वेळी पाकिस्तानकडे केली आहे. मात्र, पाकिस्तानकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही, असेही बागले यांनी सांगितले.
कुलभूषण जाधव यांच्याविरुद्ध चालवण्यात आलेल्या खटल्यातील निकालपत्र व आरोपपत्राची आणि त्याबाबतच्या अपिलाच्या प्रक्रियेची माहिती द्यावी, अशी मागणी अधिकृतरीत्या करण्यात आली आहे. जाधव यांच्याशी दूतावासामार्फत संपर्क साधण्याचीही मागणी यापूर्वी 14 वेळा करण्यात आली आहे. या दोन्ही मागण्यांबाबत पाकिस्तानच्या अधिकृत प्रतिसादाची प्रतीक्षा आहे, असे बागले म्हणाले.  जाधव यांची प्रकृती आणि त्यांचा सध्याचा ठावठिकाणा याबाबत भारताकडे कोणतीही माहिती नाही. याबाबत बागले यांनी चिंता व्यक्त केली. कुलभूषण जाधव यांच्याविरुद्ध कायद्यानुसार खटला चालवण्यात आल्याचा पाकिस्तानचा दावा खरा असेल तर त्यांनी आम्हाला एकदा कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगी द्यावी, असेही बागले यांनी सांगितले. भारताने पाकिस्तानकडे कुलभूषण जाधव यांच्यावरील कायदेशीर कारवाईचे पुरावे मागण्याची ही दुसरी वेळ आहे. जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची प्रत मागितली होती. मात्र, जाधव यांच्याविरोधात सबळ पुरावे असल्याचा दावा करणार्‍या पाकिस्तानने अजूनपर्यंत या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. दरम्यान, पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ यांनी भारतीय प्रसारमाध्यमे परिस्थितीचे अतिरंजित वर्णन करत असल्याची टीका केली. पाकिस्तानी यंत्रणांनी जाधव यांचे इराणमधून अपहरण केले, असा दावा भारताने केला आहे. मात्र, जाधव यांना अशांत बलुचिस्तानमधून अटक केल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: