Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पेट्रोलियम मंत्रालयाने पेट्रोलपंप मालकांना फटकारले
ऐक्य समूह
Friday, April 21, 2017 AT 11:26 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 20 (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘इंधन वाचवा’ या आवाहनाला प्रतिसाद देत असल्याचे कारण पुढे करून 14 मे पासून दर रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेणार्‍या मुख्यत्वे दक्षिण भारतातील पंपमालकांना पेट्रोलियम मंत्रालयाने आज चांगलेच फटकारले. दर रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवल्यास सामान्य नागरिकांना गैरसोयींना तोंड द्यावे लागेल, असे पेट्रोलियम मंत्रालयाने म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात ‘इंधन वाचवा’ असे आवाहन केले होते.
नागरिकांनी एक दिवस इंधन न वापरल्यास देशाचे आयातीवर असलेले अवलंबित्व कमी होईल, असे मोदींनी म्हटले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पेट्रोलियम वितरकांच्या संघाने दर रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेत असल्याचे सांगितले होते. मात्र, पंतप्रधानांनी केलेले आवाहन इंधन वाचवण्यासाठी असून त्याचा अर्थ पेट्रोल पंप बंद ठेवावेत, असा होत नाही, अशा शब्दात पेट्रोलियम मंत्रालयाने पंपमालकांना फटकारले आहे. देशातील 80 टक्के म्हणजे 53,224 पेट्रोल पंपमालक सदस्य असलेल्या ऑल इंडिया पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनने दर रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवले जाणार नाहीत, असे आधीच स्पष्ट केले आहे. मात्र, दक्षिण भारतातील तमिळनाडू, केरळ, पुदुचेरी, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटकमधील बंगलोरजवळील भाग आणि महाराष्ट्रातील मुंबईसह काही भागांमधील पेट्रोल पंप 14 मे पासून दर रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय पेट्रोल पंपमालकांच्या संघाने घेतला आहे. मात्र, हा निर्णय मोदींच्या आवाहनाला अनुसरून घेतला नसून पेट्रोल आणि डिझेल विक्रीवरील कमिशनमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी घेण्यात आला आहे. लहान संघटनेच्या पेट्रोल पंपमालकांनी दर रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याच्या निर्णयाला पेट्रोलियम मंत्रालयाची संमती नाही, असे ट्विट पेट्रोलियम मंत्रालयाने केले आहे. दर रविवारी पेट्रोल पंप ठेवल्यास त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होईल, असेही पेट्रोलियम मंत्रालयाने ट्विटमध्ये म्हटले असून हे ट्विट पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रिट्विट केले आहे. मोठ्या संघटनेचे सदस्य असलेल्या पेट्रोल पंपमालक आठवड्यातून एक दिवस बंद पाळणार नसल्याचे प्रधान यांनी म्हटले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: