Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘कृष्णा’च्या तत्कालीन कार्यकारी संचालकास अटक
ऐक्य समूह
Friday, April 21, 2017 AT 11:27 AM (IST)
Tags: re2
मंगळवेढा येथून अशोक नलवडेंना घेतले ताब्यात
5कराड, दि. 20 : य. मो. कृष्णा कारखान्यातील बोगस कर्ज प्रकरणी तत्कालीन कार्यकारी संचालक आणि सध्या दामाजी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहत असलेल्या अशोक श्रीरंग नलवडे यांना मंगळवेढा (सोलापूर) येथील दामाजी साखर कारखाना कार्यस्थळावरून कराड शहर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ताब्यात घेऊन आज अटक केली.त्यांना न्यायालयासमोर हजर केले असताना प्रकृतीच्या कारणास्तव न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
रेठरे बुद्रुक येथील कृष्णा साखर कारखान्यात बोगस कर्ज प्रकरणे झाल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. कारखान्याच्या 784 ऊसतोडणी वाहतूक कंत्राटदारांच्या बोगस स्वाक्षर्‍या करून प्रत्येकी सात लाख रुपयांप्रमाणे 58 कोटींचे कर्ज काढण्यात आले होते. या कर्जाबाबत ऊसतोडणी वाहतूकदार अनभिज्ञ असताना अचानक त्यांना कर्जफेडीबाबत बँकेकडून नोटिसा पाठविण्यात आल्याने हा प्रकार उघडकीस आला. तांबवे, ता. वाळवा येथील वाहतूकदार यशवंत पाटील यांनी दि. 4 ऑगस्ट 2016 रोजी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणी सुरुवातीलाच कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष अविनाश मोहिते व उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना पोलिसांनी अटक केली. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत असून काही दिवसांपूर्वी आणखी आठ माजी संचालकांनाही अटक केली आहे.
कृष्णा कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक अशोक नलवडे हे सध्या मंगळवेढा येथील दामाजी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी मंगळवेढा येथे जाऊन सायंकाळी नलवडे यांना ताब्यात घेतले. तेथून त्यांना कराड शहर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर गुरुवारी अटकेची कारवाई करण्यात आली. नलवडे यांची वैद्यकीय तपासणीसाठी केली असता त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यानंतर दुपारी नलवडे यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: