Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यमंत्र्यांनी काढला लाल दिवा!
ऐक्य समूह
Thursday, April 20, 2017 AT 11:14 AM (IST)
Tags: mn2
मंत्र्यांकडूनही अनुकरण
5मुंबई, दि. 19 (प्रतिनिधी) : ‘लाल दिवा’ वापरण्यावर निर्बंध घालून ‘व्हीव्हीआयपी’ संस्कृती मोडीत काढण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे महाराष्ट्रातही स्वागत करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या वाहनावरील लाल दिवा काढून टाकला आहे. राज्य मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनीही त्याचे अनुकरण केले आहे.
केंद्राने ‘लाल दिवा’ 1 मे पासून हद्दपार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातही त्याचे स्वागत करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने आपल्या वाहनावरील लाल दिवा काढून टाकला आहे. 
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीदेखील लाल दिवा काढला आहे. मी विरोधी पक्षनेता असताना सुरक्षा यंत्रणा वापरत नव्हतो. मंत्री झाल्यानंतरही माझ्या वाहनाला ‘सायरन’ नव्हता. त्यामुळे लाल दिवा नसला तरी फरक पडत नाही. माणूस त्याच्या कर्तृत्वाने ओळखला जातो, अशी प्रतिक्रिया तावडे यांनी दिली आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील लाल दिवा काढून टाकला आहे. बावनकुळे हे राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासोबत अवैध दारूबंदी संदर्भातील बैठकीसाठी गेले होते. केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय समजल्यानंतर त्यांनी तातडीने वाहनावरील लाल दिवा हटविला.
शिवसेनेच्या मंत्र्यांनीही या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनीदेखील लाल दिवा काढला आहे. खरे तर हा निर्णय आधीच व्हायला हवा होता. संसदेवर हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांनी लाल दिव्याची गाडी वापरूनच प्रवेश केला होता, याची आठवणही रावते यांनी करून दिली. गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनीदेखील आपल्या गाडीवरील लाल दिवा काढला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: