Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
रविवार पेठेतील धोकादायक इमारत कोसळली
ऐक्य समूह
Thursday, April 20, 2017 AT 11:20 AM (IST)
Tags: re2
सुदैवाने जीवितहानी नाही; पालिकेने बजावली होती नोटीस
5कराड, दि. 19 : कराड नगरपालिका हद्दीतील सुमारे 60 ते 70 वर्षापूर्वीची धोकादायक जुन्या इमारती उतरवण्यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाने नोटीसा बजावल्या असतानाही संबंधित मालकांकडून कानाडोळा केला जात आहे. याचाच प्रत्यय बुधवारी सकाळी सात वाजण्याचे सुमारास रविवार पेठेतील डेनाईट केमिस्ट येथील जुनी दुमजली इमारत अचानक कोसळल्यानंतर आला. यामध्ये संबंधितांची मोठी वित्तहानी झाली असली तरी सुदैवाने जीवितहानी टळली.
याबाबत अधिक माहिती अशी, की रविवार पेठेत आदिक शामराव सूर्यवंशी यांच्या मालकीची दुमजली इमारत आहे. दोन वर्षापूर्वी सूर्यवंशी यांनी ही मालमत्ता उल्हास हणमंत देशचौगुले यांना विकली आहे. या इमारतीमध्ये देशचौगुले यांचे डेनाईट केमिस्ट आहे. सध्या या इमारतीमध्ये देशचौगुले यांचे वास्तव्य आहे. सदरची इमारत जुनी व धोकादायक बनली असून ती उतरून घ्यावी, अशी नगरपालिका प्रशासनाने 10 मार्च 2017 रोजी नोटीस बजावली होती. यावेळी संबंधित मालकाने या इमारतीबाबतचा अहवाल तज्ञ इंजिनिअरद्वारे मागवला. यामध्ये सदरची इमारत धोकादायक नसून या इमारतीची किरकोळ डागडुजी करण्याचे अहवालात नमूद  करण्यात आले होते. त्याप्रमाणे संबंधित मालकाने पालिकेच्या नोटीसला याप्रमाणेच उत्तर दिले होते.
दरम्यान, डेनाईट केमिस्ट शेजारी दुसर्‍या इमारतीचे बांधकामासाठी खोदकाम करण्याचे काम सुरू आहे. बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सदरची धोकादायक इमारत कोसळली. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या झालेल्या पडझडीमुळे डेनाईट केमिस्टचेही मोठे नुकसान झाले आहे. शहरात अद्यापही 48 मालमत्ता इमारती धोकादायक स्थितीत असून 48 मालमत्ता धारकांना नगरपालिकेच्या वतीने यापूर्वीच नोटीसा बजावण्यात आल्या असल्याचे नगरपालिका बांधकाम विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: