Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘व्हीआयपी’ संस्कृती इतिहासजमा होणार
ऐक्य समूह
Thursday, April 20, 2017 AT 11:11 AM (IST)
Tags: na1
लाल दिव्यांच्या वापरावर बंदीचा निर्णय
5नवी दिल्ली, दि. 19 (वृत्तसंस्था) : सर्वसामान्य जनता आणि राजकीय नेते यांच्यामधील दरीचे प्रतीक असलेली ‘व्हीव्हीआयपी’ संस्कृती इतिहासजमा करण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. येत्या 1 मे पासून पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सरन्यायाधीश व मुख्यमंत्र्यांसह देशातील मंत्री, अधिकारी व राजकीय नेत्यांना त्यांच्या वाहनांवर ‘लाल दिवा’ वापरता येणार नाही, असा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेतला. याबाबतची अधिसूचना लवकरच जारी करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बैठकीनंतर दिली.
मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, सरन्यायाधीश, उच्च न्यायालयांचे प्रमुख न्यायाधीश, केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आणि केंद्र व राज्य सरकारी नोकरशहा यांना वाहनावर लाल दिवा लावता येणार नाही. फक्त अत्यावश्यक सेवांच्या वाहनांवर निळा दिवा लावता येईल. रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस व अन्य अत्यावश्यक सेवांच्या वाहनांवरच निळा दिवा (फ्लॅशरसह) लावता येईल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. नवीन सुधारणेनुसार कोणत्याही सदस्याला लाल दिवा वापरण्याची मुभा देण्याचे अधिकारही केंद्र आणि राज्य सरकारला नसतील, असेही त्यांनी सांगितले.
सध्याच्या नियमांनुसार केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि समकक्ष अधिकारी व नेत्यांना त्यांच्या गाडीवर लाल दिवा लावण्यास परवानगी आहे. राज्य स्तरावर अशा व्यक्तींची संख्या जास्त आहे. राजकीय नेत्यांच्या लाल दिव्याच्या हौसेमुळे त्यांच्यात आणि सर्वसामान्य जनतेमध्ये दरी निर्माण झाली होती. ‘लाल दिवा’ संस्कृतीचा फटका सर्वसामान्य जनतेला अनेकदा बसत असल्याने त्याबाबत टीका होत होती.
या आधी सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर 2013 मध्ये ‘लाल दिवा’ संस्कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. राज्यांना मोटर वाहन कायद्यात सुधारणा करून लाल दिव्याच्या वापरावर निर्बंध घालण्याचे आणि त्याचा गैरवापर करणार्‍यांना  जबर दंड ठोठावण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. फक्त घटनात्मक पदांवरील व्यक्तींना लाल दिवा वापरण्याची परवानगी देण्यात यावी, असेही या आदेशात म्हटले होते.
त्यामुळे याबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने गेल्या आठवड्यात एक बैठक घेतली होती. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेला हा विषय गेले दीड वर्ष मोदी सरकारच्या अजेंड्यावर होता. भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने याबाबत पंतप्रधान कार्यालयाला तीन पर्याय सुचविले होते. त्यामध्ये घटनात्मक पदांसह काही पदांवरील व्यक्तींना लाल दिवा वापरण्याची परवानगी असावी किंवा लाल दिव्याचा वापर पूर्णपणे बंद करावा, या पर्यायांचा समावेश होता. या संदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांशीही चर्चा करण्यात आली होती. अखेर ‘लाल दिवा’ संस्कृती पूर्णपणे संपुष्टात आणण्याच्या निर्णयावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या वाहनांवरील लाल दिवा हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही दिवसांतच केंद्रीय मंत्रिमंडळाने याबाबत निर्णय घेतला आहे. त्या आधी दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने मंत्र्यांना लाल दिव्याची गाडी वापरण्यास मनाई केली होती.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर नितीन गडकरी यांनी आपल्या गाडीवरील लाल दिवा तातडीने हटविला. लोकशाहीच्या दृष्टीने हा अत्यंत मोठा निर्णय आहे. सत्तेत असलेले लोक आणि इतर काही व्यक्ती आपल्या वाहनांवर लाल दिवा वापरत असल्याने जनतेमध्ये तीव्र नाराजी होती, असे गडकरी म्हणाले. आता याबाबत जनतेकडून सूचना मागवण्यात येतील. त्यानंतर याबाबतची अधिसूचना जारी करण्यात येईल, असे सांगतानाच लाल दिवा वापरणार्‍या प्रत्येकाने आपल्या वाहनावरील हा दिवा काढून टाकावा, असे आवाहनही गडकरी यांनी केले. गडकरी यांनी आपल्या वाहनावरील लाल दिवा काढून टाकताच काही राज्यांचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी त्यांचे अनुकरण केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: