Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
निकृष्ट अन्नाची तक्रार करणारा जवान बडतर्फ
ऐक्य समूह
Thursday, April 20, 2017 AT 11:15 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 19 (वृत्तसंस्था) : पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या सुरक्षा दलांच्या जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ दिले जात असल्याचा आरोप करून याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडयावर प्रसिद्ध केल्या प्रकरणी सीमा सुरक्षा दलाचे जवान तेजबहादूर यादव यांना बडतर्फ करण्यात आले आहे. तेजबहादूर यादव यांनी व्हिडिओमधून  लष्कर व अन्य सुरक्षा दलांच्या जवानांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याचा आरोप केला होता. याबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांवरही आरोप केले होते. याबाबतचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. या घटनेची दखल पंतप्रधानांनीही घेतली होती. या प्रकरणी गृह मंत्रालयाने सीमा सुरक्षा दलाकडून अहवाल मागितला होता. यादव यांच्यानंतर लष्करातील जवानांनीही अशाच पद्धतीचे व्हिडिओ अपलोड केले होते. त्यामुळे लष्कराने जवानांना सोशल नेटवर्किंग साईटस्चा वापर करण्यावर निर्बंध लादले आहेत. तेजबहादूर यादव यांनी 9 जानेवारी रोजी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सीमा सुरक्षा दलाने त्यांची चौकशी सुरू केली होती. सुरक्षा दलाची माहिती उघड करून प्रतिमा मलीन केल्या प्रकरणी यादव यांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. या निर्णयाविरुद्ध आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे तेजबहादूर यादव यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: