Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातारा एस. टी. बसस्थानकातील झुणका-भाकर केंद्र पाडले
ऐक्य समूह
Thursday, April 20, 2017 AT 11:21 AM (IST)
Tags: lo1
प्रशासनाची मध्यरात्रीच कारवाई
5सातारा, दि. 19 ः येथील एस.टी. बसस्थानकाच्या आवारातील झुणका- भाकर केंद्र एस.टी. प्रशासनाने महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने मंगळवारी मध्यरात्री जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केले. यावेळी एस.टी. प्रशासनाचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता. या संदर्भात प्रशासनाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे ही कारवाई नेमकी कोणी आणि कोणाच्या आदेशाने झाली, याबाबत बुधवारी दिवसभर उलगडा होऊ  शकला नाही.  सातारा एस.टी. मध्यवर्ती बसस्थानकात गेल्या अनेक वर्षांपासून झुणका- भाकर केंद्र सुरू होते. हे केंद्र अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांच्या दलित महिला विकास मंडळातर्फे चालवले जात होते. या संस्थेच्या माध्यमातून विधवा, परित्यक्त्या आणि अनाथ महिलांना रोजगार देण्यात आला होता. अत्यंत कमी किमतीत जेवण व नाश्ता देऊन ङ्गना नफा, ना तोटाफ, तत्त्वावर हे केंद्र चालवले जात होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून भाडे करारावरून एस.टी. प्रशासन व अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांच्यामध्ये वाद सुुरू होता. सुमारे 2 महिन्यांपूर्वी एस.टी. प्रशासनाने झुणका- भाकर केंद्रावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलांनी केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे प्रशासनास माघार घ्यावी लागली. गेल्या 15 दिवसांपासून प्रशासनाने झुणका- भाकर केंद्राला टाळा ठोकून पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या कारवाईवेळी पोलीस आणि आंदोलक महिलांमध्ये बाचाबाची होऊन तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हापासून महिलांनी केंद्रासमोर मंडप टाकून ठिय्या मांडला होता. असे असताना मंगळवार, दि. 18 रोजी एस. टी. प्रशासनाने झुणका- भाकर केंद्राची इमारत बुलडोझरने जमीनदोस्त केली. यावेळी एस. टी. प्रशासनाचा कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता.  मध्यरात्री कारवाई झाल्याने आंदोलक महिलाही तेथे नव्हत्या.
याबाबत विभागीय नियंत्रक अमृता ताम्हणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. ही कारवाई कोणी केली, याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: