Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘व्हीव्हीपॅट’ यंत्र खरेदीस केंद्राची मान्यता
ऐक्य समूह
Thursday, April 20, 2017 AT 11:18 AM (IST)
Tags: na2
निवडणूक आयोगाला तीन हजार कोटींचा निधी
5नवी दिल्ली, दि. 19 (वृत्तसंस्था) : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये घोळ झाल्याच्या आरोपांच्या पार्श्‍वभूमीवर ‘व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल’ (व्हीव्हीपॅट) यंत्रे खरेदी करण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसोबत ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांचा वापर झाल्यास मतदानाबाबत निर्माण होणारा संशय दूर होणार आहे. या यंत्रांच्या खरेदीसाठी निवडणूक आयोगाला 3,714.47 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने निधी मंजूर केला आहे. या निधीतून 16 लाख 15 हजार ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रे खरेदी करण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारने आतापर्यंत नवी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे खरेदी करण्यासाठी निवडणूक आयोगाला दोन टप्प्यांमध्ये 1009 व 9,200 कोटी रुपये मंजूर केले आहेत. आता ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांसाठीही सरकारने निधी मंजूर केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या निर्णयाची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. निवडणुकांमध्ये ‘ईव्हीएम’सोबत ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रे वापरण्याची मागणी निवडणूक आयोगाने सातत्याने केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांच्या खरेदीसाठी आज निधी मंजूर केला आहे. ही खरेदी दोन आर्थिक वर्षांमध्ये करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाला तातडीने 1600 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. उर्वरित निधी पुढील आर्थिक वर्षात देण्यात येईल. ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांच्या खरेदीसाठी या महिन्यात ऑर्डर दिली तर सप्टेंबर 2018 पर्यंत सर्व यंत्रे उपलब्ध होतील, असे जेटली यांनी सांगितले.
पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार केल्याचे आरोप झाले. हा वाद विनाकारण निर्माण करण्यात आल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. हा वाद निरर्थक असून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे नेहमीच सिद्ध झाले आहे. मात्र, निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांच्या खरेदीस मंजुरी देण्यात आली आहे. आपले मत योग्य ठिकाणी नोंदवले गेले आहे की नाही, याची खात्री करण्याचा अधिकार मतदारांना आहे. या यंत्रांची खरेदी पूर्ण झाल्यानंतर नजीकच्या निवडणुकीत ही यंत्रे वापरण्यात येतील, असे जेटली म्हणाले.
‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांची निर्मिती भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून  करण्यात येते. याच दोन कंपन्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचीही निर्मिती करतात. ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांच्या खरेदीसाठी निवडणूक आयोगाने जून 2014 पासून सातत्याने मागणी केली आहे. त्यासाठी आयोगाने केंद्र सरकारला आतापर्यंत 11 स्मरणपत्रे पाठवली होती. गेल्या वर्षीही मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून निधीची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक आयोगाला ‘व्हीव्हीपॅट’ खरेदीसाठी कालमर्यादा निश्‍चित करण्यास सांगितले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: