Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
स्वनिधीचे 29 कोटी 95 लाखांचे सुधारित अंदाजपत्रक सादर
ऐक्य समूह
Thursday, April 20, 2017 AT 11:24 AM (IST)
Tags: lo2
शिक्षण, बांधकाम, कृषीसह सर्व समित्यांचा निधी जाहीर
5सातारा, दि. 19 ः आचारसंहिता लागू झाल्यानंतर अर्थसंकल्पीय सभा होऊ न शकल्याने सातारा जिल्हा परिषदेच्या 2016-17 च्या अंदाजपत्रकास मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख यांनी प्रशासकीय मान्यता दिली. त्यानंतर संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या सर्वसाधऱण सभेत जिल्हा परिषदेच्या स्वनिधीचे 29 कोटी 95 लाख 55 हजार रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक सादर करण्यात आले. दरम्यान, स्थायी, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा, समाजकल्याण, आरोग्य, महिला व बाल कल्याण, शिक्षण, क्रीडा, बांधकाम, जलव्यवस्थापन व स्वच्छता आणि अर्थ समितीचा निधीही जाहीर करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या छ. शिवाजी महाराज सभागृहात संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सन 2016-17 चे अंतिम सुधारित अंदाजपत्रक अवलोकनासाठी मांडण्यात आले. सभेच्या सुरुवातीला राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद सुरेंद्र गुदगे यांनी अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेचा खर्च वाढत आहे. मात्र, शासनाकडून मिळणारा  व्यवसाय कर अद्याप वाढला नाही. मिळणारे अनुदान जिल्हा परिषदेची थट्टा करणारे आहे. यासाठी शासनाकडे अनुदान वाढीसंदर्भात प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला पाहिजे. तसेच जिल्हा परिषद मालकीच्या मोकळ्या जागा उतारा निधीतून विकसित करून उत्पन्न वाढीचे पर्याय खुले करावेत. यशवंतराव चव्हाण सभागृह एखाद्या कंपनीला भाडेतत्त्वावर देऊन उत्पन्नात वाढ करण्यासंदर्भात विचार करावा, अशी मागणी केली.
 भाजपचे गटनेते दीपक पवार यांनी पोवई नाका परिसरात असलेली जागा विकसित केली, तर जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढेल आणि चांगली वास्तू उभी राहील. अशा जागांकडे दुर्लक्ष केले तर आगामी काळात अतिक्रमण होऊन त्या जागा इतर लोक बळकावतील, असे निदर्शनास आणून दिले. काँग्रेसचे भीमराव पाटील यांनी बालआनंद मेळाव्याच्या माध्यमातून शिक्षण विभाग चांगले काम करत आहे. मात्र, मेळाव्यांना मिळणारा निधी हा अत्यंत अल्प आहे. त्यामध्ये वाढ करावी, अशी मागणी केली. शिवाजीराव चव्हाण यांनी जिल्हा परिषद मैदानात सुलभ शौचालय उभारल्यास नागरिकांची सोय होईल. तसेच मैदानाची देखभाल करण्यासाठी निधी उपलब्ध होईल, याकडे लक्ष वेधले.
 त्यानंतर विषय समितीवरील सदस्यांच्या निवडीमध्ये स्थायी  आणि महिला व बाकल्याण समितीच्या 8 जागांसाठी प्रत्येकी 9 अर्ज, पशुसंवर्धन 8 जागांसाठी 7, समाजकल्याणच्या 11 जागांसाठी 12 अर्ज, शिक्षण व क्रीडा समितीच्या 8 जागांसाठी 9, आरोग्य समितीच्या 9 जागांसाठी 8 अर्ज, बांधकामच्या 8 जागांसाठी 1 अर्ज, जलव्यवस्थापनच्या 6 जागांसाठी 7 अर्ज, अर्थ समितीच्या 8 जागांसाठी 7 अर्ज आल्याने अवघड परिस्थिती निर्माण झाली. यावेळी
सभा 15 मिनिटांसाठी तहकूब करून अध्यक्षांच्या दालनात सर्वपक्षीय सदस्यांची बैठक झाली. त्यानंतर सर्व निवडी बिनविरोध झाल्या. स्थायी समितीमध्ये सुरेंद्र गुदगे, प्रदीप विधाते, भीमराव पाटील, मानसिंगराव जगदाळे, जयवंत भोसले, रमेश पाटील, उदय कबुले, सुवर्णा देसाई यांची निवड झाली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: