Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बंधन बँक व ग्राहकाची फसवणूक केल्या प्रकरणी कॅशियरला अटक
ऐक्य समूह
Thursday, April 20, 2017 AT 11:12 AM (IST)
Tags: re1
मलकापूर शाखेतील घटना
5कराड, दि. 19 : मलकापूर येथील बंधन बँकेच्या शाखेत खातेदाराने भरलेल्या धनादेशामध्ये खाडाखोड करून तो धनादेश आपल्याच खात्यावर भरून बँकेची सुमारे पाऊण लाखांची फसवणूक करणारा कॅशियर मोहंमद रबिऊस समद (वय 36), रा. पश्‍चिम बंगाल याच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. त्यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असताना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बँकेचे येथील व्यवस्थापक प्रशांत मुंडे यांनी फिर्याद दिली. समद याच्याकडे बँकेच्या चाव्यांचे छापही आढळून आले आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फायनान्शियल बँक म्हणून मलकापुरात बंधन बँकेची शाखा आहे. त्या शाखेत कॅशियर म्हणून मोहंमद समद 2009 पासून काम करत आहे. बँकेचे खातेदार दशरथ वाघमोडे यांचे वैभव सप्लायर्स नावाची फर्म आहे. त्या फर्मसाठी त्यांनी कराड अर्बन बँकेच्या गुरुवार पेठ शाखेत 21 मार्च रोजी धनादेश भरला होता. तो धनादेश प्रत्यक्षात 29 मार्चला पास झाला. मात्र त्या धनादेशाचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले नव्हते. त्याची विचारणा करण्यासाठी वाघमोडे बँकेत गेले त्यावेळी व्यवस्थापक मुंडे यांनी त्याबाबतची सखोल चौकशी केली. प्रत्यक्ष अर्बन बँकेत जावून खात्री केली. त्यावेळी वैभव सप्लायर्सचा धनादेश पास झाला आहे. मात्र तो बंधन शाखेच्या त्यांच्या खात्यावर जमा न होता तो आर. समद यांच्या खात्यावर जमा झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. ते खाते स्टेट बँकेचे होते. त्यांनी त्याबाबत चौकशी केली असता ते खाते कॅशियर समद याचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी त्याबाबत समद याच्याकडे चौकशी त्याने त्याची कबुली दिली. त्यानंतर मुंडे यांनी बँकेच्या पुणे येथील वरिष्ठांशी बोलून त्याबाबतची रीतसर फिर्याद दिली. त्यामध्ये समद याने खातेदाराच्या आलेल्या रकमेत व धनादेशात फेरफार करून सुमारे पाऊण लाखांचा अपहार करून बँकेची व खातेदारांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: