Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विमानात गोंधळ घातल्यास 15 लाखांचा दंड
ऐक्य समूह
Tuesday, April 18, 2017 AT 11:01 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 17 (वृत्तसंस्था) : विमानांमध्ये खासदारांनी घातलेल्या गोंधळाच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर एअर इंडियाने एक प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार यापुढे विमानात गोंधळ घालणार्‍या प्रवाशांना 5 ते 15 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.
एअर इंडियाच्या प्रशासनाकडून या प्रस्तावावर विचार सुरू आहे. हा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास गोंधळी प्रवाशांना 15 लाखांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचार्‍याला मारहाण केल्याचे प्रकरण गाजले होते. त्यानंतर तृणमूलच्या महिला खासदारानेही गोंधळघातल्याने एअर इंडियाच्या विमानाचे उड्डाण विलंबाने झाले होते. त्यामुळे प्रवाशांच्या गैरवर्तनाच्या घटना रोखण्यासाठी एअर इंडिया प्रशासन कडक पावले उचलण्याचा विचार करत आहे. या प्रस्तावानुसार प्रवाशांच्या गैरवर्तनामुळे विमान सुटायला तासभर उशीर झाल्यास 5 लाख रुपये, दोन तास उशीर झाल्यास 10 लाख रुपये आणि त्यापेक्षा जास्त उशीर झाल्यास 15 लाख रुपये दंड आकारला जाऊ शकतो. सध्या हा प्रस्ताव विचाराधीन असून एअर इंडियाने याबाबत कायदेतज्ज्ञांचे मत मागवले आहे. त्यांच्याकडून या प्रस्तावाला होकार आल्यास तो केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: