Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातार्‍यात पोलिसांची अचानक तपासणी मोहीम : एक लाखाचा दंड वसूल
ऐक्य समूह
Tuesday, April 18, 2017 AT 11:07 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 17 : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या आदेशाने सातारा शहरासह जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून पोलिसांनी वाहतूक नियमनासाठी रस्त्यावर जोरदार मोहीम उघडली. वाहन चालकांच्या कागदपत्रांची तपासणी करुन पोलिसांनी सातारा शहरातच एक लाखाहून अधिक रुपयांचा दंड वसूल केला आहे तर 500 जणांवर कारवाई केली आहे. अचानक झालेल्या तपासणी मोहिमेची सातारा शहरात दिवसभर चर्चा होती.
याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यात ही मोहीम राबवण्यात आली. त्यानुसार सोमवारी सकाळी शहरातील मुख्य रस्त्यावर थोड्या थोड्या अंतरावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. येणार्‍या-जाणार्‍या वाहनांना थांबवून कागदपत्रांसह तपासणी करण्यात आली. पोवई नाका, एस. टी. स्टँड, राजवाडा, बॉम्बे रेस्टॉरंट यासह 23 ठिकठिकाणी पोलिसांची तपासणी सुरू होती. सकाळी पहिल्या टप्प्यात आणि त्यानंतर सायंकाळी दुसर्‍या टप्प्यात ही  मोहीम राबवण्यात आली असून दोन दिवस अशा पध्दतीने तपासणी होणार आहे. पोलिसांनी राबवलेल्या या कारवाईसाठी पोलीस अधिकार्‍यांचीही उपस्थिती होती. मोहीम राबवत असताना जिल्हा
पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनीही सातार्‍यात रविवार पोलीस चौकीसह ठिकठिकाणी भेटी दिल्या. दरम्यान, दर महिन्याला असे नवनवीन प्रयोग राबवले जाणार आहेत. त्यामुळे वाहन चालकांनी गाडीची कागदपत्रे जवळ बाळगावीत व वाहन चालकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: