Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

पोलिसांची बेअब्रू
vasudeo kulkarni
Tuesday, April 18, 2017 AT 11:13 AM (IST)
Tags: ag1
सर्वसामान्य जनतेचा विश्‍वास गमावलेल्या महाराष्ट्रातल्या पोलीस खात्याच्या अब्रूचे धिंडवडेच सांगलीच्या गुन्हा अन्वेषण शाखेच्या अधिकारी आणि पोलिसांनी संगनमताने कोट्यवधी रुपये हडप केल्याच्या उघड झालेल्या गुन्ह्याने निघाले आहेत. पोलीस ठाण्यात दाद मिळायची शाश्‍वती नसल्यानेच, सर्वसामान्य आणि गोरगरीब लोक आपल्यावर झालेल्या अन्यायाची फिर्याद द्यायला पोलीस ठाण्यात जायला घाबरतात. न्यायासाठी पोलीस ठाण्यात गेल्यावर, आपल्याच मागे पोलीस काही लचांड लावतील, अशी भीती सर्वसामान्यांना वाटते. किरकोळ चोर्‍या आणि गुन्ह्यांचा तपास तर लागेल आणि संशयितांना अटक होईल, यावरही आता जनतेचा विश्‍वास राहिलेला नाही. ‘सदरक्षणाय-खलनिग्रहाय’ असे महाराष्ट्र पोलीस खात्याचे ब्रीद असले, तरी प्रत्यक्षात मात्र लाचखोरी आणि भ्रष्टाचाराला सोकावलेल्या काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलिसांच्यामुळे हे खाते बदनाम झाले आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायच्या अनेक घटनाही याच बेफिकीर पोलिसांच्या तपासाने घडल्याचेही यापूर्वी निष्पन्न झाले आहे. आता कोट्यवधी रुपयांच्या चोरीचा खोटा तपास करून, चोरीला गेलेल्या प्रचंड रकमेतल्या भागावरच राजरोसपणे दरोडा घालायचा गुन्हा सांगलीच्या गुन्हा अन्वेषण शाखेत वर्षापूर्वी काम करणार्‍या पोलीस निरीक्षक विश्‍वनाथ घनवट आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज चंदनशिवे यांच्यासह सहा पोलिसांवर  कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोडोली पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने, पोलिसांची उरलीसुरली अब्रूही धुळीस मिळाली आहे. सर्वसामान्य गोरगरिबांकडून चिरीमिरी उकळणे, धमक्या, दमदाटी देणे, अटकेची धमकी देऊन लाच मागणे, अशा विविध तक्रारी या आधी पोलिसांच्याबद्दल सार्वत्रिकपणे झाल्या आहेत. पण सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणानगर येथे चोरीचे कोट्यवधी रुपये जप्त करताना, थोडीथोडकी नव्हे, नऊ कोटी अठरा लाख रुपये परस्पर हडप-लंपास केल्याचा हा गुन्हा पोलिसांनीच उघडकीस आणून, संबंधित अधिकारी आणि पोलिसांवर खोटा तपास, चोरीचा कट, संगनमताने गुन्हा करणे, अशा विविध कलमांखाली आरोप ठेवले आहेत. वर्षापूर्वी म्हणजे 13 मार्च 2016 रोजी सांगलीतल्या बेथेलहेमनगर विभागातल्या पत्र्याच्या शेडवर या संबंधित संशयित पोलीस अधिकारी आणि पोलिसांनी छापा घालून तीन कोटी रुपये जप्त केले होते. या प्रकरणी मोहिद्दीन मुल्ला याला अटक केली होती. त्यानंतर 15 मार्च 2016 रोजी वारणानगरच्या शैक्षणिक वसाहतीतल्या एका सदनिकेवर छापा घालून एक कोटी एकतीस लाख रुपये जप्त केल्याचे याच पोलिसांनी सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र जप्त केलेली रक्कम प्रचंड होती. सांगली आणि वारणानगरमध्ये घातलेल्या छाप्यात एकूण नऊ कोटी अठरा लाख रुपये या संशयित आरोपींनी परस्पर हडप केल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी कोल्हापूरचे बांधकाम व्यावसायिक झुंजार सरनोबत यांनी आपल्या वारणानगर येथील सदनिकेतून चोरीला गेलेली रक्कम आणि पोलिसांनी जप्त केल्याचे दाखवलेली रक्कम यात प्रचंड तफावत असल्याचा आणि ही रक्कम पोलिसांनीच चोरल्याची फिर्याद कोडोली पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याच फिर्यादीचा तपास करताना, सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तेव्हा छापा घालणार्‍या पोलीस अधिकारी आणि पोलिसांनी कोट्यवधी रुपये लंपास केल्याचे या गुन्ह्याचा तपास केलेल्या पथकाला आढळून आले आणि त्यांनीच कोडोली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलेल्या या चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.    

कुंपणानेच शेत खाल्ले
कोल्हापूर विभागाचे पोलीस महासंचालक विश्‍वास नांगरे -पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास जलद गतीने करायचे आदेश दिले होते. या आरोपात तथ्य असल्याचे आढळताच, त्यांनी पोलीस अधिकार्‍यासह संबंधित पोलिसांवरही गुन्हे दाखल करायचे आदेश दिले आहेत. ज्या मैनुद्दीन मुल्लाकडे कोट्यवधीची रक्कम छाप्यात सापडली, त्या मैनुद्दीनने आपण वारणानगर येथे सरनोबत यांच्या घरातून ही रक्कम चोरल्याची कबुली दिली होती. वारणानगरच्या सरनोबत यांच्या छाप्यात अकरा कोटी रुपये मिळाले असतानाही, ही रक्कम कमी दाखवण्यात आली. संशयित आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदनशिवे आणि सहकार्‍यांनी सहा कोटी रुपये घेऊन ते आपल्या नातेवाइकांच्या बँकेच्या खात्यात भरल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले. ज्यांच्या प्रचंड रकमेची चोरी झाली त्या सरनोबत, यांना संबंधित पोलीस अधिकारी आणि पोलिसांनीच आपल्या घरातून चोरी झालेली आणि नंतर छाप्यात मिळून कोट्यवधीची ही रक्कम लंपास केल्याचा संशय आला आणि त्यांनी निर्भयपणे पोलीस ठाण्यात तशी फिर्यादही दिली. पोलिसांच्याविरुद्ध फिर्याद असतानाही, नांगरे-पाटील, कोल्हापूर-सांगलीच्या पोलीस अधीक्षकांनी निष्पक्षपाती तपास करून हा गुन्हा चव्हाट्यावर आणला आहे. या गुन्ह्याने पोलीस खात्याची बदनामी होणार, अशी खात्री असतानाही, चौकशी पथकाने धडाडीने या गुन्ह्याची चौकशी करून, पोलीस खात्याच्या प्रतिमेला डांबर फासणार्‍या या संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून, कायद्यासमोर सर्वजण समान आहेत, या तत्त्वाची प्रचिती सर्वसामान्य जनतेला दिली आहे. पोलीस खात्यात प्रामाणिक आणि निष्ठावान पोलीस अधिकारी-पोलीसही आहेतच. पण लाचखोर आणि भ्रष्टाचारी पोलीस अधिकारी, पोलिसांच्यामुळे जनतेच्या-कायद्याच्या रक्षणासाठी चोवीस तास सतर्कतेने काम करणार्‍या पोलीस खात्याबद्दल सामान्य जनतेला विश्‍वास वाटत नाही, ही वस्तुस्थिती आहे. या गुन्ह्याचा तपास करून संबंधित पोलिसांनीच चोरलेल्या कोट्यवधीच्या रकमेसह, हा कट उघडकीला आणणार्‍या संबंधित चौकशी पथकाचीही प्रशंसा करायला हवी. सामान्य जनतेच्या मालमत्तेचे आणि जीविताचे रक्षण आणि चोर-गुन्हेगारांवर जरब निर्माण करायची कायदेशीर जबाबदारी असलेल्या खाकी वर्दीतल्या काही बेइमानांनी असे चोरीचे कृत्य करावे, ही लांछनास्पद बाब होय! तीस वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या बकरी बाजार परिसरातल्या जुगारी अड्ड्यावर छापा घालणार्‍या काही पोलीस अधिकारी आणि पोलिसांनी मिळून लक्षावधी रुपये हडप केल्याचे प्रकरण गाजले होते. न्यायालयात पैसे हडप केलेल्या त्या गुन्हेगारांना शिक्षाही झाली होती. कराडच्या पोलीस ठाण्यात अलीकडेच मंगळवेढ्याच्या रावसाहेब जाधव याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे प्रकरण गाजले होते. पण याबाबत गुन्हा दाखल झाल्यावरही मुख्य संशयित आरोपी असलेले निलंबित पोलीस अधिकारी विकास धस अद्यापही फरारीच आहेत. सांगली, वारणानगर चोरीच्या प्रकरणातल्या सर्व संशयितांना तातडीने अटक व्हावी, अशी अपेक्षा आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: