Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘कृष्णा’मधील भ्रष्टाचाराच्या सीबीआय चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार : खा. साबळे
ऐक्य समूह
Tuesday, April 18, 2017 AT 11:06 AM (IST)
Tags: re4
5कराड, दि. 17 : य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्यात माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या कार्यकाळात झालेल्या 58 कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचार व आर्थिक गैरव्यवहारांची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी यासाठी मुख्यमंत्री व केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती भाजपचे खा. अमर साबळे यांनी सोमवारी कराड येथे पत्रकार परिषदेत दिली.
खा. साबळे म्हणाले, कृष्णा कारखान्यातील भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. 784 शेतमजुरांच्या नावे लाखो रुपयांची बोगस कर्ज प्रकरणे करून गैरव्यवहार करण्यात आला आहे. यामध्ये अविनाश मोहिते, व्हाईस चेअरमन सुरेश पाटील यांच्यासह 7 माजी संचालकांना अटक झाली आहे. त्यांचे सहकारी संभाजी भंडारी, राहुल देसाई, यू. एस. पाटील हे अद्याप बाहेर आहेत. पुरावे नष्ट करण्याबरोबर तक्रारदारांवर दबाव आणण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून सुरू असल्याने त्यांना तत्काळ अटक करून त्यांच्या मालमत्तांची चौकशी व्हावी. फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी भाजपने हा लढा हाती घेतला आहे. या शेतकर्‍यांचा सातबारा कोरा होत नाही आणि त्यांचे कर्ज पूर्ण माफ होत नाही तोपर्यंत पाठपुरावा करणार आहे. हा भ्रष्टाचार खूप मोठा असल्याने सीबीआयमार्फत चौकशी व्हावी यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. 
या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती वाढली पाहिजे. संबंधित बँकेच्या काही अधिकार्‍यांचा यामध्ये समावेश आहे. माजी संचालक व त्यांच्या सहकार्‍यांच्या मालमत्तेतून हा पैसा वसूल झाला पाहिजे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे स्वतंत्र वकील देण्यात येईल. सहकार्‍यांचा संबंध काय, या प्रश्‍नावर खा. साबळे म्हणाले, संगनमत करणे, कागदपत्रांच्या आधारे बोगस कर्ज प्रकरणे करणे, शेतमजुरांना अंधारात ठेवणे, पैशाचा अपहार करणे  यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे चौकशीत समोर येत आहे. राजकीय द्वेषापोटी ही कारवाई होत असल्याचा आरोप नाकारताना या चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे ते म्हणाले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी व फसवणूक झालेले शेतकरी उपस्थित होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: