Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नरेंद्र मोदी - नवाझ शरीफ भेटीची शक्यता?
ऐक्य समूह
Tuesday, April 18, 2017 AT 11:08 AM (IST)
Tags: na3
5इस्लामाबाद, दि. 17 (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने मृत्युदंड ठोठावल्यामुळे भारत-पाकिस्तान द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव वाढला असतानाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची बैठक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने ‘द एक्स्प्रेस ट्रिब्युन’ या पाकिस्तानी दैनिकाला दिली आहे.
शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) शिखर परिषद कझाकस्तानमधील अस्ताना येथे जून महिन्यात होणार आहे. रशिया, चीन, मध्य आशियातील देश, भारत व पाकिस्तान हे या संघटनेचे सदस्य देश आहेत. भारत-पाकिस्तान यांनी आपले द्विपक्षीय संबंध  सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत आणि शांघाय सहकार्य संघटनेच्या हितासाठी काम करावे, या अटींवरच भारत व पाकला या संघटनेचे सदस्यत्व देण्यात आले आहे.
काश्मीर मुद्द्यावरून गेल्या तीन वर्षांमध्ये भारत व पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध तणावपूर्ण आहेत. त्यातच कुलभूषण जाधव यांना पाकच्या लष्करी न्यायालयाने मृत्युदंड ठोठावल्याने या तणावात आणखी भर पडली आहे. या पार्श्‍वभूमीवर मोदी आणि शरीफ यांच्यात शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेच्या दरम्यान बैठक होणार आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने ‘द एक्स्प्रेस ट्रिब्युन’ला दिली आहे. कुलभूषण जाधव यांच्या हेरगिरी प्रकरणाचा परिणाम द्विपक्षीय संबंधांवर होऊ नये, अशी पाकिस्तानची भूमिका आहे. कुलभूषण जाधव हा फक्त एक घटक आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याची भारताची भूमिका सिद्ध झाल्याचा मुद्दा प्रमुख आहे, असा आरोपही या अधिकार्‍याने केला. दरम्यान, भारताशी जुळवून घेणे पाकिस्तानच्याच हिताचे असल्याचे मत पाकिस्तानचे संरक्षण विषयक विश्‍लेषक आणि पाकिस्तानी लष्करातील निवृत्त अधिकारी तलत मसूद यांनी म्हटले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: