Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दारू दुकाने वाचवण्यासाठी महामार्गांचे हस्तांतरण अयोग्य
ऐक्य समूह
Tuesday, April 18, 2017 AT 10:56 AM (IST)
Tags: mn2
दिवाकर रावते यांचा सरकारला घरचा आहेर
5मुंबई, दि. 17 (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गांवरील अपघात टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगतचे बार, दारू दुकाने बंद करण्याचा आदेश दिला असताना त्यातून पळवाट काढण्यासाठी राज्यातील काही ठिकाणी राष्ट्रीय किंवा राज्य महामार्ग महापालिका, एमएमआरडीए किंवा पालिकांकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यावर प्रखर टीका करताना परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज आपल्याच सरकारला घरचा आहेर केला. अशा पळवाटा काढून सरकारच दारूविक्रीला प्रोत्साहन देत असून हा न्यायालयाचाही अवमान आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याने, असा निर्णय घेणे योग्य नसल्याची भावना रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.
महामार्गांवरील अपघात टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महामार्गापासून 500 मीटर अंतरावरील बार आणि दारू दुकानांवर बंदी घातली आहे. त्यातून पळवाट काढण्यासाठी मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमधून जाणारे राष्ट्रीय किंवा राज्य महामार्ग महापालिका, एमएमआरडीए किंवा पालिकांकडे हस्तांतरित करण्याचा धडाका सरकारने लावला आहे. दारूची दुकाने व बार वाचवण्यासाठी सरकार करत असलेली धडपड हा टीकेचा विषय झाला आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनीही आज सरकारच्या या धोरणाला तीव्र विरोध केला. न्यायालयाने दिलेले आदेश हे दारूबंदीसंदर्भात नसून रस्ते सुरक्षिततेच्या संदर्भात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांची त्यांच्या कर्मचार्‍यांचे वेतन देण्याइतकीही आर्थिक परिस्थिती नसताना त्यांच्याकडे महामार्ग हस्तांतरित झाल्याने या महामार्गांची परिस्थिती आणखी बिकट होऊन अपघात वाढण्याची शक्यता असल्याचा धोका त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात निदर्शनास आणून दिला आहे. अशा धोरणांमुळे सरकारच पळवाट काढून  दारूविक्रीस प्रोत्साहन देते आहे काय, अशी भावना जनतेमध्ये निर्माण होत आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याने असा निर्णय घेणे योग्य नाही. राज्य रस्ता सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष म्हणून माझ्या तीव्र भावना कळवत असल्याचे दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: