Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कराडमध्ये उन्नत महामार्गासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार : डॉ. भोसले
ऐक्य समूह
Tuesday, April 18, 2017 AT 11:00 AM (IST)
Tags: re2
मलकापूर नगरपंचायतीची नगरपरिषद करणार
5कराड, दि. 17 : मलकापूर ते कराड दरम्यान विशेषत: कोल्हापूर नाक्यावर पुणे-बंगलोर महामार्गावरील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पंकज हॉटेल ते जखिणवाडी फाटा या साडेतीन किलोमीटर अंतराच्या मार्गावर सुमारे 350 कोटी रुपये खर्चाच्या उन्नत महामार्गातर्गत सहापदरी उड्डाण पूल उभारण्याचा प्रस्ताव राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केंद्रीय दळणवळण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरीचे आश्‍वासन दिले असून या उन्नत महामार्गासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी दिली.
कृष्णा हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, य.मो. कृष्णा साखर कारखान्याचे संचालक जगदीश जगताप, धोंडिराम जाधव, संजय पवार उपस्थित होते.
पुणे-बंगलोर महामार्गावर असणार्‍या आपल्या कराड शहराला दळणवळणाच्यादृष्टीने महत्त्वाचे शहर म्हणून राज्यभरात ओळखले जाते. कराडमध्ये प्रवेश करताना असणारे रस्ते काहीअंशी अरुंद असल्याने शहरात येताना अनेकदा कोल्हापूर नाका येथे वाहतुकीची कोंडी होते. विशेषत: महामार्गावरील मोठी वाहने येथे आल्यानंतर अनेकदा शहरातील नागरिकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. शिवाय या वाहतूक कोंडीमुळे बर्‍याचदा अपघातही होतात. यावर पर्याय म्हणून पुण्या-मुंबईहून कोल्हापूरकडे जाणार्‍या अथवा कोल्हापूरहून मुंबईकडे जाणार्‍या मोठ्या अवजड वाहनांची शहरातील कोंडी टाळण्यासाठी पंकज हॉटेल ते जखिणवाडी या साडेतीन किलोमीटर अंतराच्या मार्गावर उन्नत महामार्गातर्गत सहापदरी उड्डाण पूल उभारण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केेंद्रीय दळणवळण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. या मार्गासाठी 350 कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. सदरचा प्रस्ताव मंजूर झाल्यास कराड शहरात होणारी अवजड वाहनांची कोंडी टळणार आहे. तसेच या उन्नत मार्गाअंतर्गत होणार्‍या उड्डाण पुलामुळे पंकज हॉटेल ते जखिणवाडी फाट्यापर्यंत सध्या अस्तित्वात असणारे अन्य पूल काढण्यात येणार आहेत. त्यामुळे या नव्या उड्डाण पुलाखालील सहापदरी रस्ते शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. त्यामुळे कराड शहरातील वाहतुकीची कोंडी निकालात काढण्यासाठी सदरचा उन्नत मार्गाचा प्रस्ताचा मंजूर व्हावा, यासाठी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार आहे. या मागणीसाठी लवकरच कराडच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचे एक शिष्टमंडळ घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली जाणार आहे.
मलकापूर नगरपंचायतीची नगरपरिषद करणार
कराड शहरालगत असणार्‍या मलकापूर नगरपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा मिळवून देण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत. वास्तविक क वर्ग नगरपरिषद करण्यासाठी आवश्यक असणारी 25000 लोकसंख्येची अट मलकापूर नगरपंचायतीने यापूर्वीच पार केली आहे. सध्या मलकापूरची लोकसंख्या जवळपास 35000 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे मलकापूर शहर नगरपरिषद व्हायला वेळ लागणार नाही, याची आम्हाला खात्री असून यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच मलकापूरमधील सांडपाणी व्यवस्थापनासाठी नगरपंचायतीने शासनाकडे प्रस्ताव द्यावा, असे आवाहनही यानिमित्त मी करत आहे. मलकापूर शहरातील रखडलेली कामे शासनस्तरावर पाठपुरावा करून मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे मलकापूरच्या विकासासाठी सत्ताधार्‍यांनी राजकारण सोडून आमच्या पाठपुराव्याला साथ द्यावी, असे आवाहन डॉ. अतुल भोसले यांनी केले.
शेणोलीपर्यंत चौपदरीकरणासाठीही प्रयत्न
दरम्यान, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी साहेबांकडे कराड तालुक्यातील आणखी एका महामार्ग विस्तारीकरणासाठी पाठपुरावा करणार आहोत. सध्या वडगाव हवेलीपर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण सुरू आहे. कार्वे चौकीपर्यंत रस्ता पूर्ण झाला असून या मार्गावरील वाहतूक लक्षात घेता हा चौपदरी रस्ता शेणोलीपर्यंत व्हावा, अशी मागणी आम्ही ना. गडकरी यांच्यांकडे करणार आहोत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: