Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
रत्नाकर गायकवाड यांना औरंगाबादमध्ये मारहाण
ऐक्य समूह
Tuesday, April 18, 2017 AT 10:58 AM (IST)
Tags: mn3
5औरंगाबाद, दि. 17 (वृत्तसंस्था) : मुंबईतील आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना औरंगाबादमध्ये डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. गायकवाड हे शहरातील सुभेदारी विश्रामगृहावर आपल्या पत्नीसोबत आले होते. कार्यकर्त्यांनी त्यांच्या पत्नीलाही मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
रत्नाकर गायकवाड यांनी मुंबईतील आंबेडकर भवन पाडण्याचा अहवाल दिला होता, असा आरोप भारिप बहुजन महासंघाने केला होता. त्याच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाकडून  गायकवाड यांना सुभेदारी विश्रामगृहात घेराव घालण्यात येणार होता. भारिपचे माजी नगरसेवक व जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ हे कार्यकर्त्यांबरोबर विश्रामगृहाजवळ आले. त्यांच्याबरोबर असलेल्या 15 ते 20 जणांनी गायकवाड यांना घेराव घालून बाबासाहेब आंबेडकर भवन का पाडले, अशी विचारणा केली. त्यावर तुम्ही कोण विचारणारे, असा प्रश्‍न गायकवाड यांनी केला. त्यावर आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, असे भुईगळ व कार्यकर्ते म्हणाले. त्यानंतर गायकवाड यांनी सुरक्षारक्षकांना या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याच्या सूचना केली. त्यावेळी पाच-सहा जणांनी गायकवाड यांना मारहाण सुरू केली. गायकवाड यांच्याबरोबर त्यांची पत्नीही होती. त्यांनाही यावेळी मारहाण झाली. मारहाण करणार्‍यांमध्ये महिला कार्यकर्त्यांचाही सहभाग होता. या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी चार पुरुष व दोन महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. अमित भुईगळ, दिनेश साळवे, श्रीरंग ससाणे, गौतम गवळी, शांताबाई घुले, रेखा उजागरे अशी त्यांची नावे आहेत. गायकवाड यांना घेराव घालणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे आधीच तेथे पोलीस उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक दीपक आवटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: