Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पोलीसच झाले ‘चोरावर मोर’
ऐक्य समूह
Monday, April 17, 2017 AT 11:18 AM (IST)
Tags: mn1
तीन कोटी रुपये हडप; अधिकारी, कर्मचार्‍यांवर गुन्हा
5सांगली, दि. 16 (प्रतिनिधी) ः सांगलीतील बेथेलहेमनगरमधील मोहिद्दीन मुल्ला याच्या पत्र्याच्या शेडवजा असलेल्या घरात सापडलेली  रोकड तीन कोटी रुपये नव्हे तर तब्बल सहा कोटी रुपये होती. त्यातील मोठी रक्कम खुद्द पोलिसांनीच हडपली. दोन दिवसांनी पुन्हा तपासाचे निमित्त करुन वारणानगरच्या शिक्षक कॉलनीत जाऊन आणखी 3 कोटी 18 लाखांची रक्कम लुटून आणल्याचा खळबळजनक प्रकार रविवारी चव्हाट्यावर आला. या प्रकरणी सांगली स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्‍वनाथ घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे यांच्यासह सहा पोलिसांवर चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. अटकेच्या भीतीने सर्व संशयित रजेवर पळाले असून पोलिसांच्या या कृत्याने पोलिसांच्या अबू्रची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
सांगलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन पथकाने दि. 13 मार्च 2016 रोजी बेथेलहेमनगर-मधील मोहिद्दीन मुल्ला याच्या घरातून 3 कोटी  7 लाख रुपयांची रोकड जप्त केल्याने खळबळ उडाली होती. नोटांची बंडले मोजण्यासाठी बँकेतील अधिकार्‍यांची आणि मशीनची मदत घ्यावी लागली होती. नोटांनी घर भरलेले बघून अनेकांना चक्कर यायची वेळ आली होती. साध्या पत्र्याच्या घरात इतकी रक्कम सापडल्याची चर्चा सर्वदूर गेली होती; परंतु ही रक्कम जप्त करताना पोलिसांनीच त्यातील 3 कोटी 18 लाख रुपयांच्या रकमेवर परस्पर डल्ला मारल्याचे कोणाच्याही ध्यानात आले नाही. सर्व काही पडद्याआड सुरू होते. त्या ठिकाणी हाताला लागलेली रक्कम कमी पडली की काय, म्हणून या हावरट पोलिसांनी पुन्हा तपासाच्या नावाखाली वारणानगरमधील शिक्षक कॉलनीत जाऊन संबंधित इमारतीतून आणखी 3 कोटी 18 लाख रुपये चोरून आणले. हा पोलिसांचा संपूर्ण कारनामा शनिवारी समोर आला.  या प्रकरणी कोल्हापूरचे बांधकाम व्यावसायिक झुंजार माधवराव सरनोबत यांनी कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ‘चोरावर मोर...’ या म्हणीचा प्रत्यय सांगली पोलिसांनी या घटनेतून आणून दिला आहे.
तुमचे काम करतो, असे सांगून पोलीस पैसे घेतात. अपघाताच्या ठिकाणी मृत झालेल्या व्यक्तींच्या अंगावरील दागिनेही पोलिसांनी हडप केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. कधी खंडणीखोरांनाही लाज वाटेल,  असे कृत्य करतात. तुमच्या खिशातहात घालून दांडगाव्याने पैसेही काढून घेतात. पोलिसांचे असे अनेक कारनामे सर्वश्रुत आहेत. मात्र, पोलिसांनी चोरट्याला हाताशी धरून कोट्यवधी रुपयांची चोरी केल्याचा लाजीरवाणा प्रकार सांगली स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन ‘कर्तव्यदक्ष’ पथकाने केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, वारणानगर, ता. पन्हाळा येथील शिक्षक कॉलनीतील बिल्डिंग क्र. 5 मधील फ्लॅट क्र. 3 मध्ये राहणारे बांधकाम व्यावसायिक झुंजार माधवराव सरनोबत (रा. कोल्हापूर) यांच्या घरातून 6 कोटी रुपयांची रोकड चोरीस गेली होती. मार्च 2016 मध्ये सांगली येथे बेथलहेमनगर येथे राहणारा मोहिद्दीन उर्फ मैनुद्दीन मुल्ला हा ऐषोरामात रहात असून पैशाची उधळपट्टी करत असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर लक्ष ठेवले होते. त्याला संशयावरून ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याच्या घरी कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम सापडली होती. सांगली स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्‍वनाथ घनवट, तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे, पोलीस नाईक दीपक पाटील, रवींद्र पाटील, हवालदार शंकर पाटील यांच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला होता. त्यांनी केलेल्या तपासामध्ये ही रक्कम वारणानगर, ता. पन्हाळा येथील शिक्षक कॉलनीतील इमारतीमधून मैनुद्दीनने चोरल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावरून या पोलीस पथकाने वारणानगर येथील या इमारतीत छापा टाकला असता त्या ठिकाणी आणखी कोट्यवधी रुपयांची रक्कम सापडली. ही रक्कम कोल्हापूर येथील बांधकाम व्यावसायिक झुंजार सरनोबत यांची असल्याचेही स्पष्ट झाले. प्रत्यक्षात ही रक्कम 6 कोटी रुपये असताना पोलीस पथकाने यातील 3 कोटी 18 लाख रुपये रक्कम कमी दाखवून उर्वरित रक्कम जप्त केल्याचे तपासात दाखविले. झुंजार सरनोबत यांनी 3 कोटी 18 लाख रुपयांच्या रकमेबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि या तपासकामात सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलीस निरीक्षक विश्‍वनाथ घनवट (रा. पुणे), सपोनि. सूरज चंदनशिवे (रा. सांगोला), दीपक पाटील (रा. कवलापूर, ता. मिरज), रवींद्र पाटील  (सध्या रा. विश्रामबाग, पोलीस वसाहत, मूळ रा. कागल), कुलदीप कांबळे (सध्या रा. वारणाली, सांगली, मूळ रा. सातारा), शरद कुरळपकर (रा. शंभरफुटी रोड, विश्रामबाग). शंकर पाटील (रा. वसंतदादा साखर कारखान्यासमोर), मैनुद्दीन मुल्ला व प्रवीण भास्कर सावंत (रा. वासूद, ता. सांगोला) यांच्या विरोधात खोटा तपास करणे, चोरीचा कट रचणे आणि संगनमत करणे या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी हर्ष पोद्दार तपास करत आहेत.
वरिष्ठांना कुणकुण लागल्याने कारवाई
मोहिद्दीन मुल्ला याच्या प्रकरणात एलसीबीच्या तत्कालीन अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी नेमका किती रकमेवर डल्ला मारला, याची कुणकुण तत्कालीन वरिष्ठ अधिकार्‍यांना त्याच वेळी लागली होती. त्याची गंभीर दखल घेऊन त्या अधिकार्‍यांनी काही बदल करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, त्यात त्यांना पूर्ण यश आले नव्हते. तत्कालीन वरिष्ठांनीच या प्रकरणाचा अहवाल दिला होता. त्या अहवालामुळेच पुढची कारवाई मार्गी लागल्याचे समजते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: