Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘कृष्णे’चे इतर माजी संचालक पोलीस ठाण्यात हजर होणार?
ऐक्य समूह
Monday, April 17, 2017 AT 11:25 AM (IST)
Tags: re1
5कराड, दि. 16 : कथित बोगस कर्ज प्रकरणाच्या आरोपावरून शिवनगर (रेठरे बुद्रुक) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याच्या सातारा आणि सांगली जिह्यातील 8 माजी संचालकांना कराड शहर पोलिसांनी शनिवारी एकाचवेळी छापा टाकून अटक केल्यानंतर सोमवारी आणखी माजी संचालकांसह या प्रकरणातील संशयित पोलीस ठाण्यात हजर होण्याची शक्यता आहे.
रेठरे बुद्रुक, ता. कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात बोगस कर्ज प्रकरणे झाल्याचा प्रकार आठ महिन्यांपूर्वी उघडकीस आला आहे. याबाबत ऊसतोडणी वाहतूकदार यशवंत रामचंद्र पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा) यांनी कराड पोलिसात फिर्याद दाखल केली होती. कारखान्याकडून सुमारे 784 लोकांच्या नावावर 58 कोटींचे कर्ज काढण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कृष्णा कारखान्याच्या 2014-15 च्या गळीत हंगामासाठी ऊसतोडणी वाहतूक करणार्‍या वाहनधारकांना प्रत्येकी 7 लाखांप्रमाणे परतफेड करण्याची नोटीस बँक ऑफ इंडियाकडून पाठविण्यात आली होती. तांबवे येथील वाहतूकदार यशवंत पाटील यांनाही ही नोटीस 26 नोव्हेंबर 2015 रोजी मिळाली. नोटीस मिळाल्यानंतर यशवंत पाटील यांच्यासह अन्य ऊस वाहतूकदारांनी बँकेत जाऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या नावे कर्ज प्रकरण असल्याचे समोर आले. संबंधित शेतकर्‍यांनी 2013-14 मध्ये तोडणी वाहतूक करारासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीची तसेच त्यांची वैयक्तिक कागदपत्रे कारखान्याकडे दिली होती. मात्र, त्या हंगामात संबंधित वाहतूकदारांना करारानुसार ठरलेली उचल न मिळाल्याने संबंधित वाहनधारकांनी तोडणी वाहतुकीसाठी आपले वाहन लावले नाही. तरीही या वाहतूकदारांच्या नावे प्रत्येकी सात लाखांचे कर्ज उचलण्यात आल्याचे बँकेच्या नोटीसीनंतर समोर आले.
या प्रकरणात 14 फेब्रुवारी रोजी अविनाश मोहिते व सुरेश पाटील यांना अटक करण्यात आली. सध्या ते दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत. तर पोलीस चौकशीत काही संचालकांची नावे  निष्पन्न झाल्यानंतर कराड शहर पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी शनिवारी सकाळी एकाचवेळी सर्व संशयित माजी संचालकांच्या सातारा आणि सांगली जिल्ह्यातील घरांवर छापा टाकून आठ माजी संचालकांना अटक केली आहे. या कथित बोगस कर्ज प्रकरणी कारखान्यांच्या तत्कालीन 23 संचालकांपैकी चेअरमन अविनाश मोहिते व व्हाईस चेअरमन सर्जेराव पाटील यांना यापूर्वीच तर शनिवारी 8 माजी संचालकांना अटक करण्यात आली आहे. यात चार-पाच बँक अधिकार्‍यांसह एकूण सुमारे 30 ते 35 जणांवर कारवाईची शक्यता असून उर्वरित माजी संचालकांसह इतर संशयित पोलीस ठाण्यात हजर होण्याची शक्यता आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: