Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मारहाणीनंतर प्रशांत आहेरराव यांच्या जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड
ऐक्य समूह
Monday, April 17, 2017 AT 11:22 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 16 ः संरक्षक भिंतीचे टेंडर काढून घेण्याच्या कारणावरुन शनिवारी सकाळी मारहाण झाल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी प्रशांत आहेरराव यांच्या शनिवार पेठेतील जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड केली. या तोडफोडीत कार्यालयातील वस्तूंचे सुमारे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत मुरार आप्पासाहेब आहेरराव (रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नगरसेवक अमोल मोहिते यांनी तोडफोड केल्याचा संशय त्यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे.
सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्र. 15 मध्ये सातारा विकास आघाडीतून प्रशांत आहेरराव आणि नगर विकास आघाडीतून अमोल मोहिते हे एकमेकांविरोधात लढले होते. त्यात अमोल मोहिते यांनी प्रशांत आहेरराव यांचा पराभव केला होता. दरम्यान, याच प्रभागात बांधायच्या संरक्षक भिंतीची निविदा प्रक्रिया सुरू असून या कामासाठी आहेरराव आणि नगरसेवक अमोल मोहिते या दोघांच्याही कार्यकर्त्यांनी निविदा भरली होती. आहेरराव यांच्या कार्यकर्त्यांनी भरलेले टेंडर हे कमी किमतीचे असल्याचे समजल्यानंतर ते मागे घेण्याच्या कारणावरुन शनिवारी सकाळी शनिवार पेठेतील वाघाची नळी परिसरात  प्रशांत आहेरराव आणि रवींद्र खरात, अजय देशमुख यांच्यात वाद झाला. या वादानंतर त्या दोघांनी दगडाने प्रशांत आहेरराव यांना मारहाण केली. या मारहाणीत आहेरराव हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, रविवारी सकाळी 7 वाजता मुरार आप्पासाहेब आहेरराव हे मुलगा प्रशांत याला पाहण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेले होते. तेथून साडे सातच्या सुमारास घरी यायला निघाले. शनिवार पेठेत आल्यानंतर त्यांना मुलगा प्रशांत याच्या जनसंपर्क कार्यालयाचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. कार्यालयाकडे गेल्यानंतर दरवाजाचा कडीकोयंडा तोडल्याचे व आतील साहित्याची तोडफोड झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
अज्ञातांनी आहेरराव यांच्या कार्यालयात असणार्‍या खुर्च्या, टेबल, कपाटे, टीव्ही व इतर साहित्याची तोडफोड केली होती. खा. उदयनराजे यांच्या तसेच आणखी एका फोटो फ्रेमची तोडफोड झाल्याचे मुरार आहेरराव यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती प्रशांत आहेरराव तसेच पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. मुरार आहेरराव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यात त्यांनी अज्ञातांनी कार्यालयातील साहित्य फोडून 25 ते 30 हजारांचे नुकसान केल्याचे तसेच कपाटातील 7 हजारांची रोकड चोरुन नेल्याचे नमूद केले आहे. याच तक्रारीत त्यांनी तोडफोड नगरसेवक अमोल मोहिते यांच्या सांगण्यानुसार झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. घटनास्थळ शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने शहर पोलिसांनी गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे वर्ग केल्यानंतर घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली. उपनिरीक्षक कदम तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: