Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पंतप्रधानांनी दिला ‘जी2’, ‘पी2’चा मंत्र मुस्लीम महिलांना न्याय मिळवून द्या
ऐक्य समूह
Monday, April 17, 2017 AT 11:19 AM (IST)
Tags: mn2
5भुवनेश्‍वर, दि. 16 (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयाने स्फुरण चढलेल्या भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘जी2’ आणि ‘पी2’ हा मंत्र दिला असून तळागाळातील जनतेसाठी आर्थिक आणि सामाजिक विकासाचा वेग वाढविण्याचे आवाहन केले. केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षांत केलेल्या कामगिरीची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करतानाच आता मोठी उडी घेण्याची योग्य वेळ आल्याचे सांगितले.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक ओडिशातील भुवनेश्‍वर येथे झाली. या बैठकीच्या समारोप प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी पक्षनेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ‘जी2’ आणि ‘पी2’ हा कार्यक्रम राबविण्याचे आवाहन केले. ‘पी2’ म्हणजे गरिबांसाठी काम करा आणि ‘जी2’ म्हणजे सुशासन राबवा, असे मोदींनी सांगितले.
पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दोन तृतीयांश बहुमत मिळवून भाजपने सत्ता हस्तगत केली आहे. गोवा आणि मणिपूरमध्ये इतर पक्ष व अपक्षांना हाताशी धरून सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत यश मिळवण्याच्या दिशेने भाजपची वाटचाल सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपने आता पूर्वेकडील  आणि किनारपट्टीवरील राज्यांकडे आपला मोहरा वळवला आहे. ज्या ठिकाणी भाजपची ताकद कमी किंवा अत्यल्प आहे, त्या राज्यांमध्ये ताकद वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीनेच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी ओडिशाची निवड करण्यात आली होती.
या बैठकीत मोदींनी केलेल्या भाषणाची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांना दिली. भाजपने गरिबांसाठी आणि सुशासनासाठी काम करण्याचे आवाहन मोदींनी केले. देश 2022 साली स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. तोपर्यंत भारताला विकसित देशांमध्ये अव्वल स्थानी नेण्यासाठी काम करा, असे मोदी म्हणाले. त्यासाठी मोदींनी महात्मा गांधींचे उदाहरण दिले. ब्रिटिशांच्या साम्राज्याचे जोखड फेकून देण्यासाठी महात्मा गांधींनी 1922 ते 1942 या 20 वर्षांच्या काळात केलेल्या भाषणांमुळे लोकांमध्ये स्वातंत्र्याचा विचार रुजला. त्यानंतर स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले. त्याचप्रमाणे आता दारिद्र्याचे जोखड फेकून देण्याचा विचार जनतेमध्ये रुजवला पाहिजे तरच गरिबांच्या संख्येत भारताचे स्थान तळाला जाईल. त्यासाठी मोठी उडी घेण्याची वेळ आली आहे, असे मोदी म्हणाले. केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षांमध्ये प्रचंड काम केले आहे. मात्र, त्याचा अर्थ असा नव्हे की, विकासाचा वेग तसाच राहिला पाहिजे. उलट आता गरिबांचा विकास आणि सुशासनाचा वेग वाढवला पाहिजे. भाजपचे प्रेरणास्थान असलेल्या पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या शिकवणीप्रमाणे कार्यकर्त्यांनी गरिबांची सेवा करावी, असे सांगताना मोदींनी ‘जलधन, वनधन व जनधन’ हा आर्थिक विकासाचा नवा मंत्र दिला. देशातील पाण्याच्या स्रोताचा कमाल वापर करून ते पाणी सिंचनासाठी उपलब्ध करून दिले तर शेतकरी आत्महत्या रोखल्या जातील. वनसंवर्धन केल्याने जंगलातील स्रोतांचा वापर आपल्या जगण्यासाठी करणार्‍या आदिवासींच्या जीवनात सुधारणा होईल आणि त्याचबरोबर पर्यावरणाचे रक्षणही होईल. जनधन म्हणजे गरिबांचे आर्थिक सक्षमीकरण करणे होय. हेच काम गोरगरिबांसाठी ‘जनधन’ बँक खाती उघडण्यातून झाले आहे, असे मोदी म्हणाले.
समाजाच्या सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहनही मोदींनी केले. मुस्लिमांच्या संदर्भात बोलताना मागासवर्गीय समाजासाठी असलेल्या विकास कार्यक्रमांमध्ये इतर मागासवर्गीय व मुस्लिमांनाही सामावून घेतले पाहिजे. मुस्लीम समाजातील महिलांना न्यायापासून वंचित रहावे लागू नये, असे सांगताना मोदींनी ‘त्रिवार तलाक’ या मुस्लिमांमधील प्रथेचा उल्लेख केला. या प्रथेमुळे मुस्लीम महिलांवर अन्याय होत आहे. मात्र, या मुद्द्यावर मुस्लीम समाजात कोणताही वाद होऊ नये तर त्यांचे प्रबोधन करून मुस्लीम महिलांना न्याय मिळवून दिला पाहिजे, असे आवाहन मोदींनी केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: