Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
प्राधिकरणाच्या कर्मचार्‍यांच्या सदनिकेतील नळालाच गळती
ऐक्य समूह
Saturday, April 15, 2017 AT 11:27 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 14 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या पिछाडीला असणार्‍या कर्मचारी सदनिकेचा नळ गेल्या तीन दिवसांपासून अखंड वाहत आहे. आजूबाजूच्या नागरिकांनी सातत्याने कल्पना देऊनही काहीच हालचाल होत नसल्याने ऐन उन्हाळ्यात पाण्याची प्रचंड नासाडी होत आहे. प्राधिकरणच पाण्याच्या बचतीविषयी गंभीर नसल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
प्राधिकरणाचे चार कंपन्यांमध्ये झालेले विभाजन मनुष्यबळाची कमतरता, ठेकेदारांची मनमानी यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा कारभार सातत्याने चर्चेत असतो. कार्यकारी अभियंत्याच्या संगीत खुर्चीचा खेळ आता कुठे कमी झाला आहे. आता पाण्याच्या प्रचंड अपव्ययामुळे प्राधिकरणाचा कारभार पुन्हा चर्चेत आला आहे. पोवई नाक्यावरील प्राधिकरण कार्यालयाच्या पिछाडीला असणार्‍या कर्मचारी वसाहतीच्या एका बंगल्याचा नळ गेल्या तीन दिवसांपासून अखंड वहात आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असताना कोणाचेच लक्ष नसल्याने प्रचंड आश्‍चर्य व्यक्त होत आहे. काही सतर्क नागरिकांनी वाहणार्‍या नळाची कल्पना मेंटेनन्स विभागाला दिली. तरी काही केल्या वाहणारा नळ कोणीच बंद केला नाही. गोडोली उपनगराचा जगतापवाडी सारखा भाग पाण्यापासून वंचित आहे. सदरबझारच्या पूर्व भागात कमी दाबामुळे तीव्र पाणी टंचाई आहे. उपनगराचे नागरिक पाण्याच्या तीव्र टंचाईने त्रस्त असताना प्राधिकरणाच्या गलथानपणामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. मागे एकदा पाण्याच्या गैरव्यवस्थापनामुळे कार्यकारी अभियंत्याला पाण्याच्या टाकीवर उभे राहण्याची शिक्षा मिळाली होती. परत टोकाची शिक्षा म्हणून सदर अभियंत्याने बदली करून घेतली होती. आता पाण्याच्या या अपव्ययासाठी कोणाला जबाबदार धरायचे? दुसर्‍या शनिवारचा निवांतपणा असल्याने प्राधिकरणाचे कार्यालय सुध्दा शांतच होते. मुख्य प्रवेशद्वार नियमाप्रमाणे कुलूपबंद होते. त्यामुळे वाया जाणार्‍या पाण्याची दखल घ्यायला कोणती यंत्रणाच तिथे उपलब्ध नव्हती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: