Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आणखी साठ हजार खातेधारक रडारवर
ऐक्य समूह
Saturday, April 15, 2017 AT 11:28 AM (IST)
Tags: na3
‘ऑपरेशन क्लीन मनी’चा दुसरा टप्पा
5नवी दिल्ली, दि. 14 (वृत्तसंस्था) : नोटाबंदीनंतर बँकांमध्ये आलेल्या मोठ्या प्रमाणातील काळ्या पैशाचा ओघ उजेडात आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन क्लीन मनी’ मोहिमेच्या दुसर्‍या टप्प्यात 60 हजार खातेधारकांची आहे. प्राप्तिकर विभागाकडून चौकशी केली जाणार आहे. या खातेधारकांनी 9 नोव्हेंबर 2016 ते 28 फेब्रुवारी 2017 या कालावधीत 9 हजार 334 कोटी रुपयांची बेहिशोबी रक्कम जमा केल्याचे प्राप्तिकर विभागाच्या निदर्शनास आले आहे. या खातेधारकांना आता नोटिसा बजावण्यात येणार आहेत.
नोटाबंदीनंतरच्या काळात 60 हजार व्यक्तींनी बेहिशोबी रोख व्यवहार केल्याचे आढळले आहे. त्यातील तेराशे व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर रोख व्यवहार केले आहेत. या लोकांची प्राप्तिकर विभागाने अतिधोकादायक व्यक्तींमध्ये गणना केली आहे. त्याशिवाय सहा हजार लोकांनी मोठ्या किमतीच्या मालमत्ता खरेदीचे व्यवहार केल्याचा संशय आहे. देशातून बाहेर पैसे पाठविण्याची 6 हजार 600 प्रकरणे आढळली आहेत. या सर्वांची ‘ऑपरेशन क्लीन मनी’ मोहिमेंतर्गत नोटिसा पाठवल्या जाणार आहेत. या नोटिसांना प्रतिसाद न देणार्‍यांची प्राप्तिकर विभागाकडून सखोल चौकशी केली जाणार आहे, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाने (सीबीडीटी) म्हटले आहे.
प्राप्तिकर विभागाच्या ‘ऑपरेशन क्लीन मनी’ मोहिमेत नोटाबंदीनंतर बँकेत जमा झालेल्या रकमेबाबत माहिती घेण्यात येत आहे. जानेवारी महिन्यात या मोहिमेचा पहिला टप्पा राबविण्यात आला होता. त्यामध्ये प्राप्तिकर विभागाने 17.92 लाख लोकांची चौकशी केली. यामधील 9.46 लाख लोकांची चौकशी प्राप्तिकर विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांकडून करण्यात आली होती तर इतरांची चौकशी ऑनलाइन करण्यात आली होती. दुसर्‍या टप्प्यातील कारवाईच्या आधी बँक खात्यांचा तपशील तपासण्यात आला आहे. नोटाबंदीनंतर मोठ्या रकमेचे व्यवहार करणारे प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत.
या मोहिमेमुळे 2016-17 या आर्थिक वर्षात प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्याचे प्रमाण 21.7 टक्क्यांनी वाढल्याचे सरकारला आढळले आहे. गेल्या पाच वर्षांतील हे प्रमाण सर्वाधिक आहे. काळ्या पैशाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. देशाच्या अर्थव्यवस्थेवर समांतर अर्थव्यवस्थेची मोठी छाया होती, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या पत्रकात म्हटले आहे.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: