Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातार्‍यातील रस्त्यांची 95 टक्के कामे पूर्णत्वाकडे
ऐक्य समूह
Saturday, April 15, 2017 AT 11:29 AM (IST)
Tags: lo2
साविआची सत्ता आल्यापासून नगरपालिकेचा कारभार गतीने; सर्व पदाधिकारी लागले कामाला
5सातारा, दि. 14 : चार महिन्यांपूर्वी सातारा नगरपालिकेत सातारा विकास आघाडीची एकहाती सत्ता आली. सत्ता आल्यानंतर साविआने गतीने कारभार करण्याचा निर्णय घेतला. साविआने ठोस पावले टाकत सातारा शहरातील अपूर्ण आणि प्रलंबित रस्त्यांची कामे करण्याचा धडाका सुरू केला असून 95 टक्के रस्त्यांची कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत. उर्वरित 5 टक्के रस्त्याच्या कामांना मंजुरी घेतली आहे. ही कामेही 2018 मार्चपर्यंत पूर्ण होतील आणि खड्डेमुक्त सातार्‍याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झालेले पहायला मिळणार आहे.
सातारा पालिकेत साविआची सत्ता आल्यानंतर नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष राजू भोसले, साविआचे सचिव अ‍ॅड. डी. जी. बनकर, बांधकाम समितीचे सभापती किशोर शिंदे, पाणीपुरवठा समितीचे सभापती सुहास राजेशिर्के ही टीम कामाला लागली आहे. मनोमीलनाच्या काळात अनेक कामे मंजूर झाली होती. मात्र, ही कामे पूर्णत्वास जात नव्हती. सत्ता आल्यानंतर पहिल्यांदा अ‍ॅड. डी. जी. बनकर यांनी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्यासोबतीने किती कामे मंजूर झाली आहेत आणि त्यातील किती कामे तातडीने करता येतील याचा आढावा घेतला. शहरातील रस्त्यांची अनेक कामे मंजूर आहेत. या कामासाठी निधीही पडून आहे. मात्र, ती कामे झालेली नाहीत हे त्यांच्या लक्षात आले. 15 मे पूर्वी डांबरीकरणाची कामे करण्याचा नियम लक्षात घेऊन रस्त्यांची कामे प्राधान्याने करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी मंजूर कामे तातडीने करण्यासाठी सर्व ठेकेदारांना एकत्र बोलावून त्यांची बैठक घेतली. ही सर्व कामे तातडीने व्हावीत यासाठी ठेकेदारांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. त्यानुसार अजिंक्य कॉलनी, मल्हार पेठ, दुर्गा पेठ, केसरकर पेठ, मंगळवार तळ्यावरील आतील बाजूचे, बोगद्याच्या परिसरातील सर्व आतील बाजूची, प्रतापगंज पेठेतील आतील बाजूच्या रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. लवकरात लवकर ही कामे पूर्ण होतील. 15 मे पर्यंत रस्त्यांची 95 टक्के कामे पूर्ण झालेली पहायला मिळतील. उर्वरित पाच टक्के रस्त्याच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली आहे. ही सर्व कामे आत्ता करणे शक्य नाही. मात्र, मार्च 2018 पर्यंत  उर्वरित कामे पूर्ण होतील आणि  खड्डेमुक्त सातारा शहराची संकल्पना प्रत्यक्षात साकार झालेली पहायला मिळेल, असे अ‍ॅड. डी. जी. बनकर यांनी दै. ऐक्यशी बोलताना सांगितले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: