Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खरीप हंगाम पूर्वतयारीची बैठक गुंडाळली
ऐक्य समूह
Friday, April 14, 2017 AT 11:15 AM (IST)
Tags: lo5
मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरसिंगचे निमित्त : तक्रारीची वाट न पाहता छापे टाका
5सातारा, दि.13 : जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्यादृष्टीने महत्त्वाची असणारी खरीप हंगाम पूर्वतयारीची बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झाली. मुळातच ही बैठक अर्धा तास उशिरा सुरू झाली. त्यानंतर बैठकीत विविध आमदारांनी कृषी विभागाच्या कार-भारावर प्रश्‍न विचारत असतानाच मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरसिंगचा निरोप आल्याने पालकमंत्री आणि सहपालकमंत्र्यांनी ही बैठक गुंडाळली. दरम्यान, शेतकर्‍यांना पेरणीसाठी देण्यात येणार्‍या बी-बियाणांच्या वाणाचा दर्जा उत्तम राखण्यात यावा. त्यासाठी कृषी विभागाच्या भरारी पथकाने तक्रारीची वाट न पाहता  छापे टाकावेत. निकृष्ट दर्जाचे बियाणे, खते तसेच कीटकनाशक विक्रेत्यांवर कारवाई करा, असे आदेश पालकमंत्री ना. विजय शिवतरे यांनी बैठकीत दिले तर प्रलंबित असलेल्या कृषी
पंपाच्या कनेक्शनबाबत अर्थमंत्री, ऊर्जामंत्री आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्‍वासन सहपालकमंत्री ना. सदाभाऊ खोत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात खरीप हंगाम 2017 ची पूर्वतयारी आढावा बैठक झाली. त्यावेळी ना. शिवतारे बोलत होते.  यावेळी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, खा.विजयसिंह मोहिते पाटील, आ. मोहनराव कदम, आ. श्रीमंत  शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शंभूराज देसाई, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, आ. शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, कृषी सहसंचालक डॉ. नारायण शिसोदे, जिल्हा अधीक्षक कृषी  जितेंद्र शिंदे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी चांगदेव बागल यावेळी उपस्थित होते.
तब्बल सहा महिन्याच्या कालावधीनंतर आलेल्या पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत खरीप पूर्वहंगामाची बैठक तब्बल अर्धा तास उशिरा सुरू झाली. सुरुवातीची दहा मिनिटे स्वागत आणि प्रास्ताविकात गेली. त्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक जितेंद्र शिंदे यांनी सादरीकरणास सुरुवात केली. त्यात त्यांनी जिल्हाधिकार्‍यांनी प्रास्ताविकात सांगितलेलीच माहिती पुन्हा दाखवली. आकडेवारी आणि माहितीचे सादरीकरण सुरू असताना आ. बाळासाहेब पाटील यांनी यावेळेस तरी भाताचे बियाण वेळेत उपलब्ध होणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला. दि. 15 मे पर्यंत सर्व बियाणे उपलब्ध होईल, असे शिंदे यांनी सांगितले. निकृष्ट बियाणे आणि खताच्या तक्रारी दरवर्षी हजारो प्रमाणात येत असतात. परंतु सरकारी पातळीवर कारवाईची संख्या मात्र दोन अंकी आकड्यात असते. सादरीकरणातील ही बाब आ. शंभूराज देसाई यांनी पालकमंत्री आणि सह पालकमंत्र्यांच्या निर्दशनास आणू देताच कृषी अधीक्षक जितेंद्र शिंदे तीच आकडेवारी पुन्हा सांगू लागले. अखेर पालकमंत्री शिवतारे यांनी त्यांची बाजू सावरत म्हणाले, शेतकरी ज्या कृषी सेवा केंद्रातून बियाणे खरेदी करतात त्या प्रत्येक कृषी सेवा केंद्रात तक्रार रजिस्टर ठेवण्याचे बंधनकारक करा. शेतकर्‍यांसाठी बियाणांबाबत तक्रार करण्यासाठी एक संपर्क क्रमांक बियाणे विक्रेत्याने प्रदर्शित करावा. कृषी विभागाने येणार्‍या तक्रारींचा आढावा घेऊन या तक्रारी गुण नियंत्रण कक्षाकडे पाठवाव्यात. म्हणजेच बोगस बियाणांवर आळा बसेल. कृषिपंपांच्या जोडणीबाबत वित्तमंत्र्यांबरोबर येत्या काही दिवसात सर्व आमदारांची स्वतंत्र बैठक घेऊन हाही प्रश्‍न मार्गी लावण्यात येईल.
मार्च 2013 नंतर जिल्ह्यात कृषिपंपाची कनेक्शन देण्यात आलेली नाहीत याबाबत आ. मकरंद पाटील यांनी प्रश्‍न विचारताच पालकमंत्री शिवतारे यांनी पश्‍चिम महाराष्ट्रात मागणी जास्त आहे. परंतु विदर्भ, मराठवाड्यातील अनुशेष भरून निघाले नसल्याचे कारण दिले जात आहे. त्यावर आ. मकरंद पाटील यांनी तुम्ही पालकमंत्री आहात, तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे,  ऊर्जामंत्र्यांकडे कैफियत मांडली पाहिजे, अशी मागणी केली. त्यावर पालकमंत्र्यांनी  विधानसभेतील विषय येथे नको, येथे बोलून उपयोग होणार नाही. तुम्ही विधानसभेत का बोलत नाही, असे सांगताच आ. मकरंद पाटील म्हणाले, आता तुमच्या जोडीला सहपालकमंत्री सदाभाऊ खोत आहेत. तुमच्या दोघांचे वजन आहे. तुम्ही मांडले तर हा प्रश्‍न सुटू शकतो. त्यावर सह पालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी मी स्वतः ऊर्जामंत्र्यांशी बोललो आहे. अर्थमंत्र्यांबरोबर सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याची बैठक घेऊ, असे सांगितले. त्यावर आमदारांनी सातारा जिल्ह्याची स्वतंत्र बैठक घ्या, असे सांगितले तर ना.शिवतारे यांनी मी पाठपुरावा करत आहे. पुरवणी अंदाजपत्रकात तरतूद होईल, असे सांगितले. आ. शंभूराज देसाई यांनी शेजारी बसलेल्या आ. दीपक चव्हाण यांना लक्षवेधी टाकण्याची सूचना केली असता आ. शिवेंद्रसिंहराजेंनी तुम्हीच टाका, अशी टिप्पणी केली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ कॉन्फरसिंगचा निरोप आल्याने बैठक गुंडाळण्यात आली.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल म्हणाले, कृषी विभागामार्फत राबवण्यात येणारे उन्नत शेती-समृद्ध शेतकरी हे अभियान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत शेतकर्‍यांनी बियाणे व खते  कोणती घेतली पाहिजे याची माहिती देऊन  पीक प्रात्यक्षिकेही दिली जाणार आहेत. त्याचा भविष्यात शेतकर्‍यांना फायदा होईल. शेतकर्‍यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या   ज्या योजना आहेत  त्या योजना या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकर्‍यांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. जिल्ह्याचे 8 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीयुक्त आहे. यामध्ये 63 टक्के खरीप व 36 टक्के रब्बीचे आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र वाढत आहे. मागणीनुसार खतांचा व बियाणांचा पुरवठा जिल्ह्याला होणार आहे. खतांच्या व बियाणांच्या तपासणीसाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. कुणी दोषी आढळल्यास या पथकाकडून कारवाई केली जाणार आहे. कृषी विभागामार्फत 8 लाख शेतकर्‍यांच्या शेतीचे माती परीक्षण करण्यात आले असून या परीक्षणासाठी 10 प्रयोगशाळा उपलब्ध आहे.  खरीप हंगामासाठी बी-बियाणे व खते कमी पडणार नाहीत याचे नियोजन करण्यात आले आहे. मूग, उडीद, सोयाबीन पिकांसाठी स्वत:कडील बियाणे वापरण्याबाबत कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या खर्चातही बचत होणार आहे. खरीप हंगाम 2017 साठी 1 लाख 28 हजार  मे. टन खताची  तर 53 हजार 867 किलो बियाणांची मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
 बैठकीस जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा परिषदेच्या विशेष समित्यांचे सभापती, पंचायत समितींचे सभापती, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: