Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

पाकिस्तानचा कांगावा
vasudeo kulkarni
Friday, April 14, 2017 AT 11:10 AM (IST)
Tags: ag1
माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याचे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणाचे पडसाद संसदेच्या अधिवेशनातही उमटले. कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी कुठल्याही स्तरापर्यंत जाण्याचा निर्धार गृहमंत्री राजनाथसिंह यांनी लोकसभेत व्यक्त केला, तर ‘कुलभूषणने काहीही चूक केलेली नाही. मुळात कुलभूषण यांचे प्रकरणच बनावट आहे. अपहरण करून त्यांना  पाकिस्तानात नेण्यात आले आहे’ असे मत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केले. दरम्यान या घटनेबाबत भारतीयांमध्ये संतापाची भावना दिसून येत आहे. त्याच वेळी जाधव यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्यासंदर्भात सरकारवरील दबाव वाढत आहे.या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर भारताने पाकिस्तानच्या कैद्यांना न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जाधव नौदलात होते; तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याशी आपला कसलाही संबंध नसल्याचे भारताने स्पष्ट केले होते. भारतीय नागरिक म्हणून त्यांना भारतीय दूतावासाशी संपर्क साधू देण्याची विनंती केली होती. परंतु पाकने ती साफ धुडकावून लावली. त्यानंतर इस्लामाबाद येथील उच्चायुक्तालयामार्फत आणखी बारा वेळा तशी विनंती करण्यात आली. परंतु या सर्व विनंत्यांना पाकिस्तानने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. जाधवना ‘वकिला’ऐवजी पाकिस्तानने ‘अधिकारी’ दिला होता असे म्हटले आहे. याचा अर्थ काय होतो? त्यामुळे त्यांना फाशी दिले तर ही भारतीय नागरिकाची केलेली हत्या असेल, असा आरोप भारताने
केला आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये जाधव यांना गुप्तहेरगिरीचा आरोप ठेवून अटक केल्यानंतर सुमारे तीन आठवड्यांपर्यंत ही बातमी पाकिस्तानने गोपनीय ठेवली होती. त्यानंतर 26 मार्चला त्यांनी ती जाहीर केली. त्यावेळी पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये जाधव हे रॉ चे अधिकारी असल्याचा आणि हेरगिरी करत असल्याचा व्हिडिओ पाकिस्तानने जाहीर केला होता. कुलभूषण यांचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर आनेवाडीतील ग्रामस्थांना धक्का बसला होता. आयएसआयच्या प्रसिद्धी विभागाने असा दावा केला, की बलुचिस्तानमधील मश्केल येथे कुलभूषण यांना अटक करण्यात आली. त्यांचे खरे नाव कुलभूषण जाधव असताना पासपोर्टवर मात्र हुसेन मुबारक पटेल असे नाव आहे. हा पासपोर्ट प्रसिद्धीमाध्यमांसमोर आणण्यात आला. ठाणे विभागीय पासपोर्ट कार्यालयाने 12 मे 2014 रोजी हा पासपोर्ट जारी केल्याचा त्यावर उल्लेख आहे. पासपोर्टमधील माहितीनुसार त्यांचे मूळ गाव सांगली दाखवण्यात आले आहे. मात्र ते हेर असते तर त्यांनी आपल्याजवळ पासपोर्ट बाळगलाच नसता असा दावा भारताने केला आहे. कुलभूषण यांचे काका सुभाष जाधव यांनी पाकिस्तानने जाहीर केलेल्या पासपोर्टवरील कुलभूषण यांचे छायाचित्र ओळखले आणि प्रसारमाध्यमांना त्यांची ओळख सांगितली. कुलभूषण 2003 पासून पाकिस्तानात मालवाहतुकीच्या व्यवसायाशी संबंधित काम करत होते. तिथून आपल्या कुटुंबीयांशी ते मराठीत बोलत असल्यामुळे त्यांच्याकडे पाकिस्तानी गुप्तचर विभागाचे लक्ष वेधले गेले असावे असे समजले जात आहे. ‘पनवेलचा फ्लॅट अवंती जाधव यांच्या नावावर असून तिथे कुलभूषण हे हुसेन पटेल या नावाने त्यांना भेटायला येत असत. त्या फ्लॅटमध्ये नंतर ते भाड्याने राहात असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. त्यांना पाकिस्तानमध्ये अटक झाल्यानंतरच आम्हाला ते अवंती जाधव यांचा मुलगा असल्याचे समजले असे कुलभूषण यांच्या पनवेलच्या फ्लॅटच्या सोसायटीच्या सचिवांनी म्हटले आहे. ‘आपण मालवाहतुकीचा व्यवसाय करत असल्याचे कुलभूषण यांनी सोसायटीला सांगितले होते आणि महिन्यातून दोन-तीनदा ते त्या फ्लॅटमध्ये येत आणि 15-20 मिनिटांमध्ये निघून जात. एके दिवशी त्यांनी सगळा माल टेम्पोत भरला आणि त्यानंतर ते कधीच या फ्लॅटकडे फिरकले नाहीत,’ असेही या सचिवांनी सांगितले. हा फ्लॅट ते गोदामासारखाच वापरत असावेत असा अंदाजही सोसायटीत व्यक्त केला जात होता. मात्र फ्लॅटच्या मेंटेनन्सचे पैसे त्यांनी कधीच थकवले नाहीत आणि त्यांच्या अटकेनंतर आता अवंती ते देतात असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या बॅचच्या काही सहकार्‍यांनी कुलभूषण यांच्याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार ते आपल्या फिटनेससाठीच नौदलात ओळखले जात होते. सर्व प्रकारचे खेळ ते उत्तम प्रकारे खेळत असत अशी माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानची खेळी
कुलभूषण जाधव हे 1987 मध्ये  राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी नौदलात 12 वर्ष काम केले. 1991-1993 दरम्यान ते लोणावळ्याच्या आयएनएस शिवाजीमध्ये होते. त्यानंतर जाधव मरिन कमांडो फोर्समध्ये दाखल झाले. नंतर कोची येथील कमांडो प्रशिक्षण केंद्रात दाखल होऊन तेथील एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला.  दरम्यान, कुलभूषण यांच्या अटकेबाबत पाकिस्तानमधील जर्मन राजदूत गुंटर मुलॅक यांनी याआधी केलेले विधान महत्त्वाचे ठरते. कुलभूषण यांना इराणमध्ये तालिबान्यांनी पकडले होते आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी त्यांचा सौदा केला असे त्यांनी म्हटले आहे. कुलभूषण यांना इराणमधून पाकिस्तानात कसे काय पाठवले गेले याचे रहस्य या खुलाशातून स्पष्ट होते. एकूणच 46 वर्षीय कुलभूषण जाधव यांच्याविषयीची सर्व माहिती पाहता ते व्यापारी होते की हेर याविषयी संदिग्धता निर्माण होते. परंतु ठोस पुराव्याअभावी अशाप्रकारे कोणालाही फाशी देणे हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग आहे. या ठिकाणी उरी येथील हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप असलेल्या दोघा पाकिस्तान्यांना भारताने नुकतेच त्यांच्यावरचे आरोप मागे घेऊन मायदेशी परत पाठवले आहे हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणून पाकिस्तानी तुरुंगात मरण पावलेल्या सरबजितसिंग यांच्या बहिणीने दलबीर कौर यांची या प्रकरणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घ्यावी अशी मागणी केली आहे. त्यांनी असेही म्हटले आहे, की क्षणभरासाठी आपण कुलभूषण हे गुप्तहेर असल्याचे मान्य केले तरी त्यांना फाशीची शिक्षा देणे कितपत योग्य आहे? गंभीर गुन्हे असलेले अनेक पाकिस्तानी आपल्या तुरुंगांमध्ये आहेत. त्यांना अशीच शिक्षा दिली पाहिजे. या पार्श्‍वभूमीवर ठोस पुरावा नसतानाही कुलभूषण यांच्या बाबतीतच पाकिस्तान दुजाभाव का करत आहे, याचे कारण पाकिस्तानला अंतर्गत आघाड्यांवर मोठ्या प्रमाणात अपयश आले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही दहशतवादाला खतपाणी घालणारा देश म्हणून पाकिस्तान बदनाम झाला आहे. भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणल्यानंतर भारताने दिलेल्या ठोस पुराव्यांमुळे पाकची नाकेबंदी झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान-मधील जनतेचे आणि आंतरराष्ट्रीय समुदायांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी पाकिस्तान अशी खेळी खेळत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: