Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

हा तर खुनाचा कटच
vasudeo kulkarni
Wednesday, April 12, 2017 AT 11:20 AM (IST)
Tags: ag1
भारतीय नौदलातले सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना भारतीय गुप्तहेर ठरवून, पूर्णपणे खोटे आरोप करून, त्यांच्यावर खोटा खटला चालवून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा, म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्यांची होळी करत, निरपराध्याच्या खुनाचा कटच होय. पाकिस्तानच्या आय. एस. आय. या गुप्तहेर संघटनेच्या प्रवक्त्याने जाधव यांना रावळपिंडीच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याचे पत्रकाद्वारे जाहीर करताच, केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने आक्रमक भूमिका घेत, हा तर जाधव यांच्या खुनाचा पूर्वनियोजित कटच असल्याचे, रोखठोकपणे बजावत पाकिस्तानच्या कट कारस्थानावरच वर्मी घाव घातला, हे योग्य झाले. पाकिस्तानचे भारतातले उच्चायुक्त अब्दुल बासिद यांना तातडीने बोलावून घेऊन, परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी दिलेल्या लेखी खलितातच, पाकिस्तानची जाधव यांना खोट्या खटल्यात आणि आरोपात गुंतवून  त्यांच्यावर केलेली ही कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आणि आंतरराष्ट्रीय कायद्याची राजरोसपणे पायमल्ली असल्याचे स्वच्छपणे नमूद केले आहे. जाधव यांच्यावर लावलेले आरोप आणि चालवलेला खटला हा फार्सच असल्यामुळे त्यात काहीही सत्याचा अंश नाही. जाधव यांच्या विरोधात कसलेही विश्‍वसनीय पुरावे नसतानाही, पाकिस्तानी लष्कराने सूड बुद्धीने त्यांच्यावर आरोप लावले. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार अटक केलेल्या जाधव यांना भारतीय दूतावासाशी संपर्क साधायची परवानगी मिळणे आवश्यक असतानाही ती दिली गेली नाही. गेल्या वर्षभरात तब्बल 13 वेळा भारतीय परराष्ट्र खात्याने पाकिस्तानी परराष्ट्र खात्याला जाधव यांना तशी संधी मिळावी, यासाठी पत्रे लिहूनही, एकाही पत्राचे उत्तर पाकिस्तानने दिलेले नाही. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार भारतीय नागरिकाला हा न्याय हक्क मिळणे आवश्यक असतानाही, पाकिस्तानने हा कायदाही उर्मटपणे पायदळी तुडवल्याचे आणि या घटनेचे गंभीर परिणाम होतील, असे या खलित्यात नमूद करण्यात आले आहे. या खलित्यावर पाकिस्तानने काहीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. पाकिस्तानात लोकशाही प्रक्रियेने सत्तेवर आलेले सरकार असले, तरीही तिथले लष्कर सरकारला जुमानीत नाही. पाकिस्तानची सर्व सत्ता लष्कराकडेच असल्याने, तिथल्या जनतेलाही मानवी आणि लोकशाहीचे हक्क मिळालेेले नाहीत. लष्कराच्या विरोधात काही बोलणे हाही जिथे गुन्हा ठरतो आणि पाताळयंत्री आय. एस. आय. अशा मानवतावादी हक्क मागणार्‍यांचे राजरोसपणे मुडदे पाडते, अशा पाकिस्तानात भारतीय नागरिकाला न्याय मिळणे शक्यच नाही. गुंडगिरी, खून आणि बलात्कारासारखे गंभीर गुन्हे करणार्‍या सराईत गुन्हेगारांना आणि दहशतवाद्यांच्या धर्मांध टोळ्यांना संरक्षण देणार्‍या पाकिस्तान सरकारने, भारताला बदनाम करायसाठीच कुलभूषण यादव यांच्यावर हेरगिरीचे, बलुचिस्तानात अशांतता आणि पाकिस्तान-चीन विशेष आर्थिक विभागात घातपातीचे कट केल्याचे पूर्णपणे बनावट आणि बिनबुडाचे आरोप करीत, गुप्तपणे रावळपिंडीच्या लष्करी न्यायालयात जाधव यांच्यावर खटला दाखल करण्यात आला. या खटल्याच्या सुनावणीची कोणतीही माहिती पाकिस्तान सरकारने भारताला दिलेली नाही.  अटकेनंतर आय. एस. आय. ने केलेल्या चौकशीत  जाधव यांच्या विरोधात कसलेही विश्‍वासार्ह पुरावे मिळाले नसल्याचे पंतप्रधानांचे परराष्ट्र विषयक सल्लागार सरताज अझिज यांनी स्पष्ट केले होते. तरीही त्याच वेळी जाधव यांची सुटका न करता तुरुंगात डांबलेल्या जाधव यांचा पाकिस्तानी लष्कराने प्रचंड छळ केला आणि आपल्याला हवा तसा कबुली जबाबही त्यांच्याकडूनच घेतला. पण त्यांच्या कबुली जबाबाची ध्वनिचित्रफीतही बनावटच असल्याचे उघड झाले होते.

बेकायदेशीर अटक
मुळात जाधव यांना आय. एस. आय. च्या टोळीने केलेली अटकच पूर्णपणे बेकायदा होती. भारतीय नौदलातून सेवा निवृत्त झाल्यावर ते जहाजाने इराणशी व्यापार करत होते. आपल्या पत्नीसह ते इराणच्या चाबहार या बंदर असलेल्या शहरात दोन वर्षांपूर्वी स्थायिक झाले होते. आय. एस. आय. च्या  एजंटांनी त्यांना इराणमध्येच गुपचूप पकडले आणि त्यांचे अपहरण करून पाकिस्तानातल्या बलुचिस्तानात सक्तीने आणले. कुलभूषण जाधव हे हुसेन मुबारक पटेल या खोट्या पासपोर्टचा वापर करून बलुचिस्तानात घुसले होते.  कराची आणि बलुचिस्तानात सरकार विरोधी अशांतता निर्माण करायचा त्यांचा कट होता. 3 मार्च 2016 रोजी त्यांना बलुचिस्तानातल्या माश्केल येथे अटक केल्याचा दावा आय. एस. आयने केला होता. ते रॉ चे एजंट असल्याचा आणि भारतासाठी बलुचिस्तानात  हेरगिरी करीत असल्याचे आरोपही आय. एस. आय. ने केले होते. त्यांना अटक झाल्याचे जाहीर झाले, तेव्हाच भारतीय  परराष्ट्र खात्याने 2003 मध्ये जाधव मुदतपूर्व सेवानिवृत्त झाल्याचे आणि सरकारचा त्यांच्याशी काहीही संबंध नसल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी भारताने केले वर्षभर पाठपुरावाही सातत्याने केला होता. जाधव यांच्याकडे बनावट पासपोर्ट सापडल्याचा आय. एस. आय.चा दावाही पूर्णपणे खोटा आहे. कारण याच गुत्पहेर संघटनेने मुंबईवर दहशतवादी हल्ला चढवणार्‍या अनेक दहशतवाद्यांना पाकिस्तानचे बनावट पासपोर्ट दिलेले होते. याच हल्ल्याचा म्होरक्या दाऊद इब्राहिम यालाही पाकिस्ताननेच खोटा पासपोर्ट देऊन काही काळ दुबईत आश्रयाला ठेवले होते. आता तो पाकिस्तानातच आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील विश्‍वव्यापार केंद्रावर भीषण दहशतवादी हल्ला चढवलेल्या अल् कायदाचा म्होरक्या ओस्मा बेन लादेनलाही याच पाकिस्तानने अबोटाबादमध्ये आश्रय दिला होता. अमेरिकन नौदलाच्या कमांडोंनी त्याचा खात्मा केला होता. खोटे पासपोर्ट आणि भारतीय चलनातल्या खोट्या नोटा छापण्यात आय. एस. आय. तरबेज असल्याच्या घटना अनेकदा जगासमोर उघडकीस आल्या आहेत. भारताला बदनाम करायसाठीच निरपराध जाधव यांचे  आय. एस. आय. ने इराणमधून केलेले अपहरण हाच आंतरराष्ट्रीय गुन्हा असल्याने त्यांच्यावरचा खटलाही आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार पूर्णपणे बेकायदा आहे. जाधव यांना शिक्षा सुनावताच भारताने मुदत संपलेल्या 12 कैद्यांची सुटका करायला नकार देत, पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले आहेच. आता पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर पूर्णपणे एकाकी पाडून आणि जागतिक दबाव वाढवून निरपराध
जाधव यांना भारताच्या ताब्यात द्यायला केंद्र सरकारने भाग पाडायला हवे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: