Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

गोरक्षकांचे क्रौर्य
vasudeo kulkarni
Saturday, April 08, 2017 AT 11:30 AM (IST)
Tags: ag1
राजस्थानातल्या अलवर जिल्ह्यात स्वयंघोषित गोरक्षकांच्या जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत हरियाणातल्या एका शेतकर्‍याला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना, देशातल्या तथाकथित गोरक्षकांच्या क्रौर्यावर प्रकाशझोत टाकणारी आहे. कडव्या हिंदुत्वनिष्ठ विचारांचे योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री झाल्यानंतर, आपणच प्राचीन भारतीय परंपरेचे वारसदार आहोत, असे समजणार्‍या देशभरातल्या गोरक्षकांना नवा चेव आला. त्याच उन्मादातून ही घटना घडली आहे. योगी आदित्यनाथ यांनी सत्तासूत्रे हाती घेताच, उत्तर प्रदेशातले बेकायदा कत्तलखाने बंद पाडले. आपल्या राज्यात गोरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी होईल आणि गोहत्या करणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी जाहीर केल्याने, कायदा हातात घेऊन गोरक्षण करणार्‍यांना चिथावणी मिळाली. आदित्यनाथ यांच्याच गोरक्षणवादी धोरणाचा पुरस्कार करीत गुजरात सरकारने, गोहत्येचा गुन्हा करणार्‍याला जन्मठेपेच्या शिक्षेचा कायदा मंजूर केला, तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांनी गोहत्या करणार्‍यांना फाशीला लटकवू, अशी धमकी दिली. परिणामी गोपालन आणि गो संरक्षण करणार्‍या तथाकथित ठेकेदारांना आपण कायदा हातात घेऊन, निरपराध्याचा प्राण घेत आहोत, याचे भान राहिले नसल्यानेच अलवर जिल्ह्यात गायी विकत घेऊन हरियाणातल्या आपल्या गावी ट्रकने नेणार्‍या शेतकर्‍याचा खून झाला आहे. हरियाणातल्या जयसिंघपूर या गावातल्या दहा शेतकर्‍यांनी राजस्थानातल्या जयपूर महापालिकेच्या क्षेत्रात दुधाच्या व्यवसायासाठी गायी विकत घेतल्या होत्या. या गायी ट्रकने आपल्या गावी हे शेतकरी नेत असताना नूह तालुक्यातल्या गावात हे ट्रक राष्ट्रीय महामार्गावरच जमावाने अडवले आणि या गायी बेकायदेशीरपणे कत्तलखान्याकडे नेल्या जात असल्याचा आरोप करीत, या शेतकर्‍यांना बेदम मारहाण केली. आम्ही गायी विकत घेतल्या आहेत आणि त्या दुधाच्या व्यवसायासाठी आम्ही गावी नेत आहोत, असे सांगत या शेतकर्‍यांनी अनावर झालेल्या जमावाला गायी विकत घेतल्याच्या पावत्या दाखवायचाही प्रयत्न केला. पण, त्यांचे काही न ऐकता जमावाने त्यांना बडवून काढले. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या चौघांना पोलिसांनी उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले तर 55 वर्षे वयाच्या पेहलू खान यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनीही नीट चौकशी न करताच जखमी झालेल्या या शेतकर्‍यावर बेकायदेशीरपणे गायींची वाहतूक केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. पेहलू खान याच्या मृत्यूप्रकरणी तिघांना अटकही केली आहे. गायी विकत घेऊन आपल्या गावी ट्रकने नेणार्‍या शेतकर्‍यावर खोटा गुन्हा पोलिसांनी नोंदवल्याचे निष्पन्न झाल्याने, केंद्र सरकारनेही तातडीने या घटनेचा अहवाल राजस्थान सरकारकडे मागितला आहे. पेहलू खान हा म्हैस विकत घेणार होता. पण ऐनवेळी त्याने दररोज बारा लीटर दूध देणारी गाय विकत घेतली आणि हाच त्याचा गुन्हा ठरला. गाय विकत घेतल्यामुळेच त्याला आपल्या प्राणांची किंमत द्यावी लागली. धिंगाणा घालणार्‍या त्या जमावाने शेतकर्‍यांना मारहाण करून त्यांचे पैसेही काढून घेतल्याचा आरोप पेहलू खानच्या मुलाने केला आहे.

गोरक्षण हवे, पण...
आपल्या प्राचीन भारतीय परंपरेनुसार गायीला देव मानले जाते. गायीमुळेच शेतकर्‍यांना शेतीसाठी बैल मिळतात. गाय शेतकर्‍यांच्या कुटुंबाला आणि लोकांनाही दूध देऊन त्यांचे पोषण करते. गायीच्या शेण आणि मुत्राचा उपयोग पिकांच्या खतासाठीही होतो. आपली संस्कृती कृषिप्रधान असल्यानेच गायीबद्दल कृतज्ञता आणि आदराची भावना हजारो वर्षे कायम राहिली. हिंदुत्ववादी संघटना आणि साधुसंतांनीही केंद्र सरकारने गोहत्या कायदा करावा, यासाठी देशव्यापी आंदोलनेही केली होती. सरकारने गोहत्या बंदीचा कायदा केला आणि अंमलातही आणला. या कायद्यामुळे भाकड आणि अल्पवयीन गायींच्या कत्तलीवर कायदेशीरपणे बंदी आली. भाकड आणि वृद्ध गायींचा सांभाळ करायची तरतूदही या कायद्यात असल्याने, अशा गायींच्या पालनाची जबाबदारी सरकारने स्वीकारली. पण, प्रत्यक्षात मात्र गायींच्या पालनासाठी देशभरात व्यापक प्रमाणात गोशाळा, पांजरपोळ सरकारने स्थापन केलेले नाहीत. सामाजिक संस्था आणि संघटनांद्वारे चालवल्या जाणार्‍या पांजरपोळांना सरकारचे अनुदान तुटपुंजे असल्याने, गायींच्या चारा आणि पालनाची नीट व्यवस्था होऊ शकत नाही. बहुतांश शहरात पांजरपोळातल्या गायी चारा आणि खाद्यपदार्थांचा शोध घेत, रस्त्यारस्त्यावर कळपाने हिंडत असतात. या कळपामुळे वाहतुकीची कोंडीही होते. कचर्‍यातल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, विषारी पदार्थ खाल्ल्यानेही आतापर्यंत शेकडो गायींचे प्राण गेले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता, केंद्र आणि राज्य सरकारने गोहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी करतानाच, गायींच्या पालनासाठीही उत्तम व्यवस्था करायला हवी. आम्ही गोरक्षक आहोत, अशा आरोळ्या ठोकत निरपराध्यांना मारहाण करणार्‍यांवरही कडक कायदेशीर कारवाई केल्याशिवाय, गायी विकत घेऊन कायदेशीरपणे वाहतूक करणार्‍या शेतकर्‍यांवरचे हल्ले थांबणार नाहीत. स्वयंघोषित गोरक्षक रस्त्यावर उतरून गायींची बेकायदेशीरपणे वाहतूक रोखायच्या घटना देशभरात घडत आहेत. या गोरक्षकांनी अशा घटना घडल्यास कायदा हातात न घेता, पोलिसांना घटनास्थळी बोलावून घ्यायला हवे. कायदा हातात घेऊन निरपराध्यांना दोषी ठरवून चोपून काढणे, हे काही गोरक्षण नव्हे. भारतीय तत्त्वज्ञानानुसार सर्व प्राणिमात्रात एकच आत्मा आहे, हे लक्षात घेता गायीचे रक्षण करायसाठी माणसाचा प्राण घेणे त्यांचा छळ करणे हे काही समर्थनीय होऊच शकत नाही. बेकायदा गोहत्या आणि प्रयत्न करणार्‍यांना कायदेशीरपणे शिक्षा होईल, अशा घटनांची पोलीस कसून चौकशी करतील, याचे भान धिंगाणा घालायला सोकावलेल्या गोरक्षकांनी ठेवायला हवे. ते त्यांच्यात नसल्यामुळेच गायीचे प्राण वाचवायच्या गोंडस नावाखाली शेतकर्‍यांवर हल्ल्याच्या या घटना वाढत आहेत, ही चिंतेची बाब होय. खुद्द आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मठातल्या गोशाळेचे प्रमुख आणि कर्मचारी मुस्लीम धर्मीयच आहेत, ही बाबही गोहत्येच्या कायद्याचे स्वयंघोषित रक्षक असणार्‍यांनी लक्षात घ्यायला हवी. देशातले लाखो मुस्लीम शेतकरीही गायींचे पालन करीत आहेत. ते शेतकरीच आहेत. शेतकर्‍यांना आणि गोपालकांना कोणत्याही धर्माची पट्टी लावता येणार नाही, शेतकरी हाच खरा धर्म आहे आणि या धर्माचे म्हणजेच सर्वांना जगवायच्या ब्रिदाचे पालन गोरक्षक आणि सरकारनेही करायला हवे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: