Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कृषी क्षेत्रामुळे राज्याचा विकासदर 9.4 टक्क्यांवर
ऐक्य समूह
Saturday, March 18, 2017 AT 11:17 AM (IST)
Tags: mn3
कर्जाचा बोजा, महसुली तूट वाढणार
5मुंबई, दि. 17 (प्रतिनिधी) : नोटाबंदीमुळे यावर्षी राज्याच्या अपेक्षित महसुलात घट झाली असली तरी सलग तीन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा चांगला पाऊस झाल्याने कृषी व संलग्न क्षेत्राची तब्बल 12.30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे राज्याला 9.4 टक्के विकासदर गाठण्यात यश आले आहे. राज्याच्या दरडोई उत्पन्नात तब्बल 15 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. एकीकडे हे समाधानकारक चित्र असताना दुसरीकडे राज्यावरील कर्जाचा बोजा 3 लाख 56 हजार कोटींवर गेला असून वित्तीय तूट 35 हजार कोटी रुपयांवर गेली आहे, असे राज्याच्या 2016-17 या वर्षाच्या आर्थिक पाहणी अहवालातून पुढे आले आहे.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा 2016-17 चा आर्थिक पाहणी अहवाल आज विधिमंडळात सादर केला. आर्थिक पाहणी अहवालानुसार 2014-15 साली असलेला 5.4 टक्के विकासदर 9.4 टक्क्यांवर गेला आहे. दोन वर्षांपूर्वी उणे असलेला कृषी क्षेत्राचा विकासदर चांगल्या पावसामुळे यंदा 12.30 टक्क्यांवर गेला आहे. उद्योग क्षेत्रात 6.7 टक्के तर सेवा क्षेत्रात 10.8 टक्के वाढ अपेक्षित आहे. दरडोई उत्पन्नात 2014-15 च्या तुलनेत 11 टक्क्यांनी वाढ होऊन ते 1 लाख 32 हजार 241 वरून 1 लाख 47 हजार 399 पर्यंत गेले आहे.
तीन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामात तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया व कापसाच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. मात्र, उसाचे उत्पादन तब्बल 28 टक्क्यांनी घटले आहे. 
रब्बीच्या उत्पादनाही घट झाली आहे.
कर्जाचा भार 3 लाख 56 हजार कोटींवर!
2016-17 चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी 3645 कोटींची महसुली तूट दाखवली होती. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार 2 लाख 20 हजार 810 कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न व 2 लाख 24 हजार 455 कोटींची महसुली खर्च अपेक्षित होता; परंतु महसुलात अपेक्षित वाढ न झाल्याने विकासकामांना कात्री लावून ही तूट नियंत्रणात ठेवण्याची कसरत अर्थमंत्र्यांना करावी लागली आहे. 2014-15 साली 31 हजार 827 कोटींची तूट होती. ती यावेळी 35 हजार कोटी रुपयांच्या वर जाणार आहे. मुद्रांक व नोंदणी, वीज अधिभार, जमीन महसूल, माल व प्रवासी कर आदींमधून अपेक्षेपेक्षा कमी महसूल मिळाला आहे. मागच्या वर्षाच्या अखेरीस राज्यावर सुमारे 3 लाख 20 हजार कोटी रुपयांचे कर्ज होते. हा बोजा या वर्षात वाढून 3 लाख 56 हजार 213 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
एक लाख लोकांमागे 97 हजार 300 मोबाईल
आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्यात प्रत्येकी एक लाख लोकांमागे 97 हजार 349 मोबाईल आहेत तर इंटरनेट वापरणार्‍या लोकांची संख्या तब्बल 4 कोटी 72 लाख झाली आहे. लँडलाइन ग्राहकांमध्ये मात्र मोठी घट झाली आहे.
महिला, बालकांवरील गुन्ह्यांमध्ये वाढ
कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवरून सरकारला नेहमीच टीका सहन करावी लागत असून त्याला दुजोरा देणार्‍या काही बाबी आर्थिक पाहणी अहवालातूनही पुढे आल्या आहेत. गेल्या दोन वर्षात महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये जवळपास 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बलात्कार, अपहरण, हुंडाबळी, विनयभंग आदी गंभीर स्वरूपाचे तब्बल 32 हजार 548 गुन्हे 2016 साली नोंदवण्यात आले. बालकांवरील अत्याचाराचे तब्बल 13 हजार 591 गुन्हे नोंदवले गेले आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: