Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अतिक्रमण मोहिमेत 100 हून अधिक टपर्‍या उद्ध्वस्त
ऐक्य समूह
Saturday, March 18, 2017 AT 11:15 AM (IST)
Tags: mn1
तहसील कार्यालय ते क्रीडा संकुल रस्त्याने घेतला मोकळा श्‍वास
5सातारा, दि. 17 : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या आदेशाने सातार्‍यात शुक्रवारपासून सातारा पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली. यामध्ये दिवसभरात तहसील कार्यालय ते बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे काढण्यात आली. पोवई नाका ते हुतात्मा चौक, कोरेगाव रस्त्यावरील 100 हून अधिक टपर्‍यांची अतिक्रमणे अक्षरश: तोडण्यात आली. किरकोळ प्रकार वगळता मोहिमेला फारसा विरोध झाला नाही. या मोहिमेमुळे तहसील कार्यालय ते  जिल्हा क्रीडा संकुल या रस्त्याने मोकळा श्‍वास घेतला.
पोलिसांच्या पुढाकाराने मंगळवारी पालिका,  बांधकाम विभाग आणि पोलीस यांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत अतिक्रमण मोहीम वेगाने राबवण्याचा निर्णय झाला. मोहीम सुरू होणार असल्याचे जाहीर होताच बुधवारी अनेक जणांनी  आपली अतिक्रमणे स्वत:हून काढून घेतली होती. ज्यांनी आपली अतिक्रमणे हटवली नव्हती त्यांची अतिक्रमणे या मोहिमेत शुक्रवारी हटवण्यात आली. शुक्रवारी सकाळीच सर्व शासकीय यंत्रणा तब्बल 200 अधिकारी व कर्मचार्‍यांसह तहसील कार्यालयासमोर हजर होते.  
तहसील कार्यालयापासून अतिक्रमण हटाव मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. अतिक्रमण हटवण्यासाठी आणलेली वाहने आणि जेसीबी यांच्यामुळे दिवसभरात अनेकवेळा वाहतुकीची कोंडी झाली. मात्र कोंडी दूर करुन मोहीम सुरुच ठेवण्यात आली. तहसील कार्यालय ते हुतात्मा चौकानंतर पथकाने कोरेगाव रस्त्यावरील अतिक्रमणे काढली. सकाळी दहाच्या सुमारास शिवाजी सर्कल येथून अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरवात झाली. तहसील कार्यालय, बाजार समिती, आयटीआय, सुभाषचंद्र बोस चौक, करंजे येथील स्वागत कमानीपर्यंत मोहीम राबवली गेली.  करंजे येथील ओढ्याजवळ काही दुकानदारांनी दुकानांबाहेर लोखंडी अँगल टाकून सुमारे पाच ते सात फुटांचे अतिक्रमण केले होते. पालिकेच्या जेसीबीने रेलिंग काढून टाकण्यात आली. तेथून भूविकास बँक, कणसे हॉस्पिटल व येथून  पुन्हा ही मोहीम पोवई नाक्याच्या दिशेने गेली. जिल्हा क्रीडा संकुल, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, काँग्रेस भवन, तहसील कार्यालय, पोस्टाच्या आंब्या खालील विक्रेत्यांना हटवत पथकाने कोरेगाव रस्त्यावरील अतिक्रमणे काढली. जिल्हा परिषदेच्या कोपर्‍यावरील अतिक्रमणे, विसावा नाका, अण्णासाहेब कल्याणी हायस्कूलच्या  तेथेही मोहीम राबवण्यात आली.  शहरातील सर्व अतिक्रमणे निघेपर्यंत ही मोहीम सुरुच राहणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.  या मोहिमेत सातारा पालिकेचे 30, सार्वजनिक बांधकाम विभागाचे 40 व 150  पोलिसांचा फौजफाटा  सहभागीझाला होता. 
पोलीस उपविभागीय अधिकारी खंडेराव धरणे, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील. तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे आणि बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी नाका परिसराची पाहणी करून कारवाईच्या सूचना केल्या. अतिक्रमण निरीक्षक शैलेश अष्टेकर आणि त्यांच्या 25 कर्मचार्‍यांनी कारवाईत मुख्य भूमिका बजावली.  डंपर, जेसीबी, 6 ट्रक आणि इतर साहित्यांसह रस्त्यावर उभ्या राहिलेल्या अतिक्रमणावर हातोडा टाकण्यात आला.  पोवई नाका ते 7 स्टार बिल्िंडग येथील अतिक्रमणे हटवण्यातच यंत्रणेचे दोन तास गेले. हुतात्मा उद्यान चौकात स्टेडियमच्या परिसरात उभ्या राहणार खासगी बसेस आणि  चायनीज गाड्यांमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत होती. काही टपर्‍या बर्‍याच वर्षापासून बंद अवस्थेत होत्या, त्याही हटवण्यात आल्या.  स्टँड परिसराच्या एंट्री गेटपासून ते हुतात्मा उद्यान चौकार्पंत सुमारे  50 टपर्‍यांची अतिक्रमणे उद्ध्वस्त करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर व पंचायत समिती हॉकर्स झोनचा अपवाद वगळता बांधकाम विभागाच्या भिंतीलगत असणारी शेडची अतिक्रमणे तोडून काढण्यात आली. तोडलेले सर्व साहित्य डंपरमधून सोनगाव कचरा डेपोकडे रवाना करण्यात आले.
हॉकर्स संघटनेचा विरोध
दरम्यान, हॉकर्स संघटनेने अतिक्रमण हटाव मोहीम बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे.  याबाबत त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. पूर्वसूचना न देता कारवाई करण्यात आल्याचाही त्यांचा आरोप आहे. पालिकेने फेरीवाला समितीची बैठक घेऊन संघटनेने सुचवलेल्या जागेत हॉकर्स झोन जाहीर करावेत. विक्रेत्यांना परवाने द्यावेत. फेरीवाला समितीच्या निर्णयाशिवाय फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई करू नये, अशी त्यांची मागणी आहे.  निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव निकम, जिल्हा सरचिटणीस शामराव चिंचणे, शहर अध्यक्ष संजय पवार यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. 

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: