Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गोव्यातही भाजपच ‘बाहुबली’; काँग्रेसचा घात
ऐक्य समूह
Friday, March 17, 2017 AT 11:07 AM (IST)
Tags: na2
पर्रिकरांनी 22 विरुद्ध 16 मतांनी जिंकला ‘विश्‍वास’
5पणजी, दि. 16 (वृत्तसंस्था) : गोवा विधानसभेत भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने गुरुवारी विधानसभेत बाजी मारताना विश्‍वासदर्शक ठराव 22 विरुद्ध 16 मतांनी जिंकला. काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे सुपुत्र विश्‍वजित राणे हे विश्‍वासदर्शक ठरावाच्या वेळी अनुपस्थित राहिल्याने काँग्रेसचे संख्याबळ 16 वर आले. त्यामुळे पर्रिकर हे दोन दिवसांचे ‘सुलतान’ ठरतील, हा काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांचा दावा पोकळ ठरला. विश्‍वासदर्शक ठरावानंतर विश्‍वजित राणे यांनी आमदारकीचा राजीनामा देतानाच पक्षालाही सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे.
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून मनोहर पर्रिकर यांच्या शपथविधीला काँग्रेसने घेतलेला आक्षेप न्यायालयाने फेटाळला होता. शपथविधीनंतर 48 तासांत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश न्यायालयाने पर्रिकर सरकारला दिले होते. त्यानुसार आज विधानसभेत नवनिर्वाचित आमदारांना हंगामी अध्यक्ष सिद्धार्थ कुंकळकर यांनी शपथ दिल्यानंतर पर्रिकर सरकारने विश्‍वासदर्शक ठराव मांडला. आमदारकीची शपथ घेतल्यानंतर विश्‍वजित राणे यांनी या ठरावावरील मतदानाच्या वेळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या निषेधार्थ सभात्याग केला. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ 17 वरून घटून 16 झाले. पर्रिकर यांच्याकडे भाजपचे 13, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष व गोवा फॉरवर्ड पार्टी यांचे प्रत्येकी तीन आणि तीन अपक्ष आमदार, असे एकूण 21 संख्याबळ होते. मात्र, विश्‍वासदर्शक ठरावाला राष्ट्रवादी काँग्र्रेसचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांनीही समर्थन दिल्याने पर्रिकर सरकारने हा ठराव 22 विरुद्ध 16 मतांनी जिंकला. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत असलेल्या गोव्यात फक्त 13 जागा जिंकूनही बहुमतासाठी आवश्यक असलेला जादुई आकडा गाठून भाजपने सत्ता राखली.
दरम्यान, आज सकाळी काँग्रेस आमदार विश्‍वजित राणे यांनी आपण सध्या पक्षातच असल्याचे सांगत काँग्रेसलाच मतदान करणार असल्याचे विधानसभेत जाताना पत्रकारांना सांगितले होते. विश्‍वासदर्शक ठराव संमत झाल्यानंतर मात्र त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाबरोबरच आमदारकीचा राजीनामाही हंगामी सभापती सिद्धार्थ कुंकळकर यांच्याकडे पाठवून दिला. गोव्यात सत्ता स्थापन करण्यात काँग्रेस नेतृत्वाला आलेल्या अपयशावर जाहीर टीका करून विश्‍वजित राणे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यापूर्वीही त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून गोव्यातील ‘फियास्को’ला कारणीभूत असलेल्या नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. ही कारवाई न झाल्यास पक्षाचा राजीनामा देण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. अखेर विधानसभेत विश्‍वासदर्शक ठरावावरील मतदानानंतर त्यांनी आपले शब्द खरे केले. आता त्यांच्याविरुद्ध अपात्रतेची कारवाई करण्याबाबत न्यायालयात धाव घेण्याचा इरादा काँग्रेसने व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीनेही चर्चिल आलेमाव यांना पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल नोटीस दिली आहे. या नोटिसीला उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. याबाबत समाधानकारक उत्तर न दिल्यास अपात्रतेची कारवाई करण्याचा इशाराही राष्ट्रवादीने दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने भाजपला दोन दिवसांत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. निवडणूक निकालानंतर पर्रिकर दिल्लीतून गोव्यात आले आणि 16 तासांत त्यांनी बहुमतासाठी आवश्यक आमदारांना भाजपकडे घेऊन सरकारची स्थापना केली. भाजपने आपल्याला कोणताच धोका नसून 22 आमदारांचे आम्हाला समर्थन असल्याचे म्हटले होते.
राणे यांचे ‘हायकमांड’वर टीकास्त्र
काँग्रेसचे पक्षनेत्वृत्व गोव्यामध्ये सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरले आहे. काँग्रेसकडून आता कोणतीही आशा नसून त्यांनी जनतेचा विश्‍वासघात केला आहे, अशी घणाघाती टीका विश्‍वजित राणे यांनी केली आहे. मी या पक्षाला कंटाळलो आहे, अशा शब्दात त्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. वाळपई मतदारसंघातून निवडून आलेल्या विश्‍वजित राणे यांच्या  आमदारकीच्या राजीनाम्यामुळे या मतदारसंघात आता पुन्हा निवडणूक होणार आहे. पुन्हा निवडणूक लढणार का, असे विचारले असता मतदारांचे मत जाणून घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेणार असल्याचे राणे यांनी सांगितले.
पर्रिकर यांची टोलेबाजी
दरम्यान, विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंग यांचा थेट नामोल्लेख न करता जोरदार टोलेबाजी केली. गोव्यात तुम्ही काम करण्यापेक्षा मौजमजा करण्यास आलात तर अशीच स्थिती होणार, असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसचे नेते मोठा गाजावाजा करून बहुमत चाचणीसाठी दिल्लीतून गोव्यात आले होते. दिग्विजयसिंग यांच्याकडून काही तरी होईल, अशी काँग्रेसची अपेक्षा होती. मात्र, तुम्ही गोव्यात मौजमजा करण्यासाठी आल्यास अशीच अवस्था होणार. या विजयामुळे काँग्रेसचा संख्याबळ असल्याचा दावाही फोल ठरला आहे, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुन्हा गोवा आणि मणिपूर येथील सरकारे भाजपने काँग्रेसकडून ‘चोरली‘ असा आरोप केला होता. त्यालाही पर्रिकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आम्हाला पाठिंबा असल्याचे आम्ही भारतीय जनतेला दाखवून दिले आहे. आम्ही विधानसभेतही बहुमत सिद्ध केले आहे. आम्ही विरोधकांसारखे कोणत्याही आमदाराला हॉटेलमध्ये किंवा निर्जन ठिकाणी कोंडून ठेवले नव्हते. सर्व जण स्वयंस्फूर्तीने आम्हाला पाठिंबा देण्यासाठी विधानसभेत आले. आमच्याविरुद्ध स्वैर आरोप करण्यात येत आहेत. मात्र, तुम्ही जसा चष्मा घालाल, तसेच दिसेल, असा पलटवार पर्रिकर यांनी केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: