Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महाराष्ट्रात देवेंद्रच!
ऐक्य समूह
Friday, March 17, 2017 AT 11:05 AM (IST)
Tags: mn2
नेतृत्वबदलांच्या वावड्यांना गडकरींकडून पूर्णविराम
5मुंबई, दि. 16 (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात उत्तम काम करत आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये यांनी चांगली ताकद दाखवून दिली आहे. त्यांचे पद स्थिर असून महाराष्ट्रात नेतृत्वबदल होणार नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज स्पष्ट केले. त्यामुळे गेले दोन-तीन दिवस नेतृत्वबदलाबाबत सुरू असलेल्या वावड्यांना पूर्णविराम मिळाला आहे.
विधानभवनापासून जवळच असलेल्या शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या कार्यालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील संभाव्य नेतृत्वबदलाच्या अफवांचे खंडन केले. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देऊन गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देशाच्या संरक्षणमंत्रिपदी नियुक्ती होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती.
फडणवीस यांना केंद्रात घेऊन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लावली जाणार, अशी चर्चा गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू होती. या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात नेतृत्वबदल होणार नसल्याचे स्पष्ट केले. देशाच्या संरक्षणमंत्रिपदी कोणाची नियुक्ती  होणार याबाबतच्या प्रश्‍नाला उत्तर देताना, सध्या केंद्रातील नेते उत्तर प्रदेश व उत्तराखंड येथील मुख्यमंत्री ठरविण्यास प्राधान्य देत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. गोव्यातील राजकीय घडामोडींबाबत बोलताना गडकरी म्हणाले, गोव्यात विकासासाठी केंद्राची मदत व स्थिर सरकार असणे ही इतर पक्षांची भावना होती. पर्रिकर मुख्यमंत्री होणार असतील तर आमचा पाठिंबा असेल, असे पत्र त्यांनी दिले होते. पर्रिकर यांनीही मुख्यमंत्री होण्याची तयारी दर्शविली. राजकारणात ‘फास्ट ट्रॅक कोर्टा’सारखे निर्णय घ्यावे लागतात. आम्ही तो घेऊ शकलो. काँग्रेसला मात्र ते जमले नाही. जो पक्ष आपला नेता लवकर निवडू शकत नाही, तो सरकार काय चालवणार? उशीर केल्यामुळे काँग्रेसची बस चुकली, असा टोला गडकरी यांनी लगावला. सर्वोच्च न्यायालयानेही काँग्रेसची हरकत फेटाळून लावली. काँग्रेसच्या एका सदस्याने राजीनामा दिल्याने आता त्यांचे संख्याबळ 16 झाले आहे. मतदारांचा कौलही भाजपच्या बाजूने आहे. आम्हाला 34 टक्के तर काँग्रेसला 28 टक्के मते मिळाल्याचेही गडकरी म्हणाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: