Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भट्टाचार्य यांनी माफी मागावी, अन्यथा हक्कभंग
ऐक्य समूह
Friday, March 17, 2017 AT 11:13 AM (IST)
Tags: mn3
राधाकृष्ण विखे-पाटील यांचा इशारा
5मुंबई, दि. 16 (प्रतिनिधी) : शेतकरी कर्जमाफीबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी केलेले विधान शेतकर्‍यांचा अवमान करणारे आहेच, पण त्यांनी विधिमंडळाच्या अधिकारांचाही भंग केला आहे. त्यामुळे भट्टाचार्य यांनी शेतकर्‍यांची तत्काळ माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात हक्कभंग आणण्यात येईल, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला आहे.
अरुंधती भट्टाचार्य यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी स्टेट बँकेच्या  मुख्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की अरुंधती भट्टाचार्य या देशाच्या किंवा राज्याच्या ‘पॉलिसीमेकर’ नाहीत. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्याचा अधिकार विधिमंडळाचा आहे. या अधिकारावर त्यांनी गदा आणण्याचा प्रयत्न केला आहे. भट्टाचार्य या लोकसेवक असून त्यांनी लोकसेवकच रहावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली, तेव्हा त्या गप्प होत्या. आता
महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतरच त्यांना आर्थिक शिस्त कशी आठवते? त्यांच्यात धाडस असेल तर
शेतकरी कर्जमाफी न करण्याबाबतची आपली मते पंतप्रधानांना कळवावीत. याच अरुंधती भट्टाचार्य अध्यक्ष असलेल्या स्टेट बँकेने कर्जबुडव्या विजय मल्ल्यांसह असंख्य धनदांडग्या उद्योगपतींची 1 लाख 40 हजार कोटींची कर्जे ‘राईट ऑफ’ केली आहेत, याकडेही विखे-पाटील यांनी लक्ष वेधले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: