Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
2019 साठी भाजपची आखणी
ऐक्य समूह
Friday, March 17, 2017 AT 11:04 AM (IST)
Tags: na1
दलित, युवकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन
5नवी दिल्ली, दि. 16 (वृत्तसंस्था) : विधानसभा निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर भाजपने गुरुवारी झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीत 2019 च्या लोकसभा निवडणुकीची आखणी केली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर व गोवा या राज्यांमधील विजयामुळे भाजप नेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मात्र, या प्रचंड यशानंतर आता 2019 मधील लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करा आणि दलित व युवकांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचा, असे आवाहन या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या विजयानंतर आम्ही स्वस्थ बसणार नाही. उलट आणखी जोमाने असेच यश मिळवण्यासाठी काम करत राहू, असेही मोदींनी सांगितले.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, सर्व मंत्री व खासदार उपस्थित होते. या बैठकीत निवडणुकांमधील यशाबद्दल मोदी व शहा यांचे आभार व्यक्त करणारा आणि अभिनंदन करणारा ठरावा संमत करण्यात आला. त्यानंतर बैठकीत बोलताना पंतप्रधानांनी पक्षाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज रहावे, असे आवाहन केल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना दिली. त्याचबरोबर भाजपचा स्थापना दिवस 6 एप्रिल ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल या कालावधीत पक्षातर्फे देशभरात गावपातळीपासून पंचायत पातळीपर्यंत विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आतापर्यंत भाजपचा प्रमुख मतदार मध्यमवर्गीय, शहरी असल्याचे म्हटले जात होते. मात्र, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दलित व अल्पसंख्याक समाजानेही भाजपला मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याचे स्पष्टझाले आहे. त्यामुळे 2019 मध्येही 2014 ची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी दलित आणि युवकांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन मोदींनी या बैठकीत केले.  
युवकांना आकर्षित करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी 6 ते 14 एप्रिल या कालावधीत जास्तीत जास्त युवकांना ‘भीम अ‍ॅप’ डाऊनलोड करण्याचे आणि त्याचा वापर करण्याचे शिक्षण द्यावे. डिजिटल पेमेंटसाठी प्रोत्साहित करावे. त्याचबरोबर डॉ. आंबेडकर यांच्या सुशासनाचा आदर्श ठेवून त्यांच्या कार्याचा प्रसार युवकांमध्ये करावा, असे मोदींनी सांगितले आहे. आजचे युवक टीव्ही आणि वृत्तपत्रांपेक्षा मोबाईलवर द्वारे जास्त माहिती मिळवतात. त्यामुळे त्यांच्याशी डिजिटल आणि समाजमाध्यमांमधून संपर्क वाढवावा. दहावी झालेल्या युवकांच्या संपर्कात रहावे, अशा सूचना पंतप्रधानांनी दिल्या.
2019 च्या तयारीला लागा
विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी तयार केलेल्या रणनीतीमुळेच भाजपला अभूतपूर्व यश मिळाले आहे. आता अमित शहा यांनी 2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश पक्षाच्या नेत्यांना दिले आहेत. निवडणुकीसाठी बाहेरून रणनीतिकार आणण्यापेक्षा पक्षातील रणनीतिकारांना पुढे आणावे, असेही शहा यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीमध्ये शहा यांनी सुनील बन्सल यांना रणनीतिकार म्हणून संधी दिली होती. आता पुढील निवडणुकांसाठी बन्सल यांच्यासारखे नेते शोधून काढण्याचीही जबाबदारी शहा यांनी त्या त्या राज्यांमधील बड्या नेत्यांवर सोपविली आहे.
पंतप्रधान मोदींनी पदभार स्वीकार केल्यापासून ते आतापर्यंत जी कार्ये केली आहेत, त्यांचा योग्य प्रचार करण्याच्याही सूचना नेत्यांना देण्यात आल्या आहेत. केवळ जाहिरातींवर अवलंबून न राहता विविध योजनांच्या माध्यमातूनच लोकांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा निर्धार आहे, असे अनंतकुमार यांनी सांगितले.
                         
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: