Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
धनगर आरक्षणासाठी दहिवडीत ‘पिवळे’ वादळ
ऐक्य समूह
Friday, March 17, 2017 AT 11:12 AM (IST)
Tags: re2
5बिजवडी, दि. 16 : अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजातर्फे माण तालुक्यात ‘दाखला मागणी अर्ज दाखल करणे’ अभियान राबवल्यानंतर आज सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या जयंतीदिनी हजारो धनगर समाजबांधवांचा मल्हार क्रांती मोर्चा दुपारी 1 वाजता दहिवडी तहसील कार्यालयावर पोहोचला. तालुक्यातील धनगर समाजाच्यावतीने ‘अहिल्या कन्यां’नी अनुसूचित जमाती दाखला मागणीचे अर्ज तहसीलदार सुरेखा माने यांच्याकडे सुपूर्त केले.
धनगर समाजाने महाराष्ट्रात अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आंदोलनाचा एल्गार केला होता. या आंदोलनाची धग एवढी होती, की त्यात आघाडी सरकार संपून महायुतीची सत्ता आली; परंतु सत्ता आल्यानंतर शासनाला आपल्या आश्‍वासनांचा विसर पडला. धनगर बांधवांची मागणी ‘जैसे थे’ राहिली आणि सरकार आपल्याच विश्‍वात मग्न राहिले. झोपेचे सोंग घेतलेल्या याच सरकारला जाग आणण्यासाठी फक्त घोषणा न देता कृतिशील आंदोलनाच्या मार्गाने जाग आणण्याचा निर्धार धनगर बांधवांनी केला आहे. त्याचेच पहिले पाऊल म्हणून माणमध्ये प्रत्यक्ष दाखला मागणी अभियानासाठी मल्हार क्रांती मोर्चा काढण्याचे निश्‍चित करण्यात आले. मागील दोन महिन्यांपासून या अभिनव आंदोलनाची तयारी सुरू होती. माणमधील वाड्यावस्त्यांवर जाऊन या आंदोलनाची माहिती देऊन अर्ज भरून घेण्यात येत होते.
सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या जयंतीदिनी मल्हार क्रांतीच्या आंदोलनचा एल्गार होणार होता. त्यासाठी संपूर्ण दहिवडी शहर सज्ज झाले होते. जागोजागी पिवळे ध्वज फडकत होते तर मल्हार क्रांतीचे फ्लेक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. आज सकाळपासूनच तालुका व जिल्ह्याच्या विविध भागातून धनगर बांधवांचे थवे दहिवडीच्या दिशेने येत होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास दहिवडी येथील सिद्धनाथ मंदिरात ‘अहिल्या कन्यां’च्या हस्ते सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. त्यानंतर ‘एक लढा जातीचा, धनगरांच्या ख्यातीचा’ अशा घोषणा देत मूक मोर्चास सुरुवात झाली. राज्यभरात यापूर्वी निघालेल्या मराठा मोर्चाप्रमाणेच याही मोर्चाची रचना करण्यात आली होती. रणरणत्या उन्हात निघालेल्या मोर्चाच्या अग्रभागी युवती, महिला होत्या. त्यांच्या मागे तरुण व इतर होते. सर्वात शेवटी विविध पक्षांचे पदाधिकारी होते. या मोर्चामध्ये मेंढपाळापासून शेतकरी, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, उद्योजक, तरुण या सर्वांचा सहभाग होता. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व शांततेत सिद्धनाथ मंदिरापासून मार्डी चौक, मायणी चौक, फलटण चौक, कर्मवीर पुतळ्यापासून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयाजवळ आल्यावर अहिल्या कन्यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर तहसीलदार सुरेखा माने मोर्चास सामोर्‍या गेल्या. मागील दोन महिन्यांपासून तालुक्यातून भरण्यात आलेले सात हजार 551 दाखला मागणी अर्ज अहिल्या भगिनींनी तहसीलदारांकडे सुपूर्त केले. त्यानंतर आंदोलनाची सांगता झाली.
या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चा, आ. जयकुमार गोरे, शेखर गोरे, जिल्हा परिषद सदस्या डॉ. भारती पोळ, जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, शिक्षण समितीचे माजी सभापती अ‍ॅड. भास्करराव गुंडगे, म्हसवड पालिकेतील विरोधी पक्षनेते अकिल काझी, पंढरपूरच्या राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष हेमलता पांढरमिसे, कराडचे शिवाजी गावडे, फलटणचे बापू लोखंडे बहुजन विकास आघाडी, बहुजन क्रांती मोर्चा आदींनी धनगर समाजाच्या मल्हार क्रांती मोर्चास जाहीर पाठिंबा दिला होता.
पोलीस उपअधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या नेतृत्वाखाली
माण-खटावमधील पोलीस कर्मचार्‍यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले. त्यामुळे वाहतुकीचा आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न
निर्माण झाला नाही. दहिवडी नगरपंचायतीने मोर्चेकर्‍यांना टँकरने पाणीपुरवठा केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: