Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फलटण पंचायत समितीच्या सौ. रेश्मा भोसले सभापती, श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर उपसभापती
ऐक्य समूह
Wednesday, March 15, 2017 AT 11:23 AM (IST)
Tags: re4
5फलटण, दि. 14 : फलटण पंचायत समितीच्या सभापतिपदी सौ. रेश्मा राजेंद्र भोसले यांची तर उपसभापतिपदी श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर उर्फ बाळराजे खर्डेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समितीवरील आपले निर्विवाद वर्चस्व अधिक मजबूत करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी झाली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजप, राष्ट्रीय काँग्रेससह अन्य  राजकीय पक्षांनी मोठ्या तयारीने पंचायत समिती ताब्यात घेण्याचा केलेला निर्धार आणि निवडणूक प्रचारादरम्यान या राजकीय पक्षांनी उच्चपदस्थ नेत्यांसह अन्य पदाधिकार्‍यांना येेथे पाचारण करुन केलेले प्रयत्न पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र या तालुक्यात आणलेले कृष्णेचे पाणी, औद्योगिक विकास आणि वीज, पाणी, रस्ते, आरोग्य शिक्षण आदी नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवून आगामी काळातही याच पध्दतीने तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही देत गेल्या 25 वर्षांप्रमाणेच आगामी काळातही साथ करण्याचे आवाहन मतदारांना केले. त्याची नोेंद घेवून मतदारांनीही फलटण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 7 पैकी 6  आणि पंचायत समितीच्या 14 पैकी 12 जागा राष्ट्रवादीकडे देवून राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार आणि ना. रामराजे यांच्या नेतृत्वावरील विश्‍वासावर सहाव्यांदा शिक्कामोर्तब केले.
सभापतिपदी निवड झालेल्या सौ. रेश्मा राजेंद्र भोसले यांनी यापूर्वी होळच्या सरपंचपदावरुन केलेले काम अत्यंत उत्कृष्ट आणि ग्रामस्थांना मोहविणारे असल्यानेच त्यांची साखरवाडी गणातून राष्ट्रवादीद्वारे उमेदवारी जाहीर होताच केवळ होळच नव्हे संपूर्ण साखरवाडी गणातील गावांनी त्यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्णय घेवून प्रत्यक्ष कार्यवाही केली. त्यामुळेच आपल्या नजीकच्या प्रतिस्पर्धीपेक्षा सुमारे अडीच हजार मते अधिक घेवून त्या विजयी झाल्या.
राष्ट्रवादीद्वारे पंचायत समितीवर निवडून गेलेल्या सौ. रेश्मा भोसले यांना त्यांचे सासरे न्यू फलटण शुगर वर्क्स आणि साखरवाडी शिक्षण संस्थेद्वारे सतत राजकारण व समाजकारणात आघाडीवर असलेल्या शामराव भोसले (मामा) यांच्या कामकाज पध्दतीचा त्याचप्रमाणे त्यांचे पती राजेंद्र भोसले यांनी यापूर्वी साखरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि आता उपसरपंच म्हणून कार्यरत असताना केलेल्या कामाचा व लोकसंपर्काचा फायदा झाला आहे. या दोघांच्या मार्गदर्शनाखाली सौ. रेश्मा भोसले यांनी या गावचे सरपंचपद अत्यंत उत्तमप्रकारे सांभाळल्याच्या पार्श्‍वभूमीवर आता पंचायत समितीच्या सभापतिपदावरुन संपूर्ण तालुक्याच्या विकासाची गती वाढविण्यासाठी त्यांना महाराष्ट्र विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे, आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे सदस्य श्रीमंत संजीवराजे यांच्याप्रमाणेच सहकारी पंचायत समिती सदस्यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन निश्‍चित उपयुक्त ठरेल. त्यातून आपली कारकिर्द अधिक उज्ज्वल करण्यासाठी त्या जोमाने प्रयत्न करीत यशस्वी होतील, अशा शुभेच्छा अनेकांनी सभापतिपदी निवड झाल्यानंतर व्यक्त केल्या आहेत. उपसभापतिपदी निवड झालेले श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर उर्फ बाळराजे खर्डेकर यांना त्यांचे पिताश्री श्रीमंत दादाराजे खर्डेकर, चुलते उद्योगपती श्रीमंत बंटीराजे खर्डेकर त्याचप्रमाणे श्रीमंत रामराजे, आ. दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य तर आहेच परंतु त्यांनी  यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, फलटण पंचायत समितीचे सदस्य, विविध सहकारी संस्थांच्या संचालकपदाद्वारे सातत्याने राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून वाढविलेला लोकसंपर्क, लोकांची केलेली कामे यामुळे त्यांना सार्वजनिक क्षेत्रातील कामाचा मोठा अनुभव निश्‍चितच आहे त्यामुळे ते उपसभापतिपदावर उत्कृष्ट काम करतील यात शंका नाही. त्यांनीही आसू गणातून नजीकच्या प्रतिस्पर्ध्याचा 2 हजारांहून अधिक मतांनी पराभव करुन विजयश्री खेचूून आणली आहे.
आगामी काळात फलटण पंचायत समितीद्वारे सभापती सौ. रेश्मा भोसले, उपसभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर आणि पंचायत समितीचे सर्व सदस्य निश्‍चितपणे तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती देतील, अशा शुभेच्छा या निवडीनंतर अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. नवनिर्वाचित सभापती, उपसभापती आणि सदस्यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडीसाठी प्रांताधिकारी संतोष जाधव यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी या निवडीचा कार्यक्रम जाहीर करुन सकाळी 11 वाजता गटविकास अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सूचना केली होती. त्यानुसार दोन्ही पदांसाठी केवळ एकेक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने प्रांताधिकारी तथा पीठासीन अधिकार्‍यांनी  दोन्ही पदांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. प्रांताधिकार्‍यांनी निवडी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह उपस्थित ग्रामस्थांनी एकच जल्लोष करीत नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांसह सदस्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान, महाराष्ट्र विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, श्रीमंत दादाराजे खर्डेकर, आ. दीपक चव्हाण, उद्योगपती श्रीमंत बंटीराजे खर्डेकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, महानंदचे व्हाईस चेअरमन डी. के. पवार, शामराव भोसले (मामा), माजी सभापती शंकरराव माडकर यांच्यासह नवनिर्वाचित जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी नवनिर्वाचित सभापती, उपसभापतींना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: