Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कर्जाला कंटाळून पतीने पत्नीसह तीन चिमुरड्यांना नदीत फेकले
ऐक्य समूह
Wednesday, March 15, 2017 AT 11:04 AM (IST)
Tags: mn1
िं पत्नीसह चार जणांचा मृत्यू िं पती बचावला
5कराड, दि. 14 : कर्जाला कंटाळूून एका दाम्पत्याने आपल्या पोटच्या तीन चिमुरड्यांना नदीपात्रात फेकून देऊन त्यांचा खून केला. त्यानंतर त्या दोघांनी नदीत उडी घेतली. या दुर्दैवी घटनेतून पती सुरक्षितरीत्या बाहेर पडला. परंतु पत्नीसह दोन मुले व चार महिन्यांच्या मुलीचा नदीत बुडून मृत्यू झाला. हृदय पिळवटून टाकणार्‍या या दुर्दैवी घटनेने एकच खळबळ उडाली. पत्नी मीनाक्षी (वय 23), मुलगा हर्ष (साडेतीन वर्षे), श्रवण (दीड वर्ष) व चार महिन्याची मुलगी, अशा चौघांचा समावेश आहे तर अमोल हणमंत बोंगाळे (वय 30) असे वाचलेल्या पतीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी, की मलकापूर, ता. कराड येथील बैलबाजार रोडलगत असलेल्या अजंठा पोल्ट्री फार्मसमोर अमोल बोंगाळे हा पत्नी मीनाक्षी, मुलगा हर्ष व श्रवण तसेच चार महिन्याच्या मुलीसह राहत होता. अनेक महिन्यांपासून हाताला काहीही कामधंदा नसल्याने तो आर्थिक विवंचनेत होता. त्यामुळे अमोलचे कुटुंब नैराश्याखाली होते. घरखर्च व उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने अनेक जणांकडून हातउसने व कर्ज स्वरूपात पैसे घेतले होते. मात्र, कामधंदा नसल्याने लोकांकडून उचललेल्या पैशाची परतफेड त्याला करणे अशक्य झाले होते. याबाबत काहींनी त्याच्याकडे पैशासाठी तगादाही लावला होता. यामुळे अमोलसह त्याची पत्नी मीनाक्षी हे दोघेही तणावाखाली होते. याच नैराश्येतून त्यांनी सोमवारी रात्री आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मंगळवार, दि.14 रोजी पहाटे तीनच्या सुमारास अमोल व मीनाक्षी त्यांच्या हर्ष, श्रवण तसेच चार महिन्याच्या मुलीला घेऊन दुचाकीवरून कोल्हापूर नाक्यानजीक पुणे-बंगलोर या राष्ट्रीय महामार्गावरील कोयना पुलावर आले. तेथून अमोलने त्याचा चुलत भाऊ सतीश शंकर बोंगाळे याला फोन करून मी कुटुंबासह कोयना पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या करीत आहे, असे सांगितले. त्यावेळी आत्महत्या क़रू नकोस, मी तिथे येतो, तू थांब, असे सतीश म्हणाला. मात्र, अमोलने त्याचे काहीही न ऐकता फोन कट केला. घाबरलेल्या सतीशने तातडीने याबाबतची माहिती कराड शहर पोलिसांना दिली. त्यावेळी रात्रगस्तीवर असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्यासह कर्मचारी कोल्हापूर नाक्यानजीकच्या पुलावर पोहोचले. तसेच सतीश व त्याचा मित्र रामचंद्र डमाकले हे सुद्धा त्या ठिकाणी आले. महामार्गावरच त्यांना अमोलची दुचाकी आढळून आली. तसेच पुलाच्या कठड्यावर मीनाक्षी व अमोलची चप्पल तसेच अमोलचा मोबाईल आढळून आला. सर्वांनीच नदीपात्रात उडी घेतल्याची शक्यता बळावल्याने पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, या घटनेनंतर सुमारे एक तासाने अमोल नदीपात्रातून बाहेर आला. घटनास्थळी शोध घेणार्‍या पोलिसांना तो सापडला. कोणी तरी मला नदीतून बाहेर काढले. मात्र, कोणी काढले हे माहीत नाही, असे त्याने पोलिसांना सांगितले. त्याची प्रकृती खालावल्यामुळे पोलिसांनी त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. 
मंगळवारी सकाळपासून पाणबुड्यांच्या सहाय्याने नदीपात्रात मीनाक्षीसह दोन मुले व मुलीचा शोध घेण्याचे काम सुरू होते. दुपारी दीडच्या सुमारास नदीपात्रात कोयनेश्‍वर मंदिरापासून काही अंतरावर चार महिन्याच्या मुलीचा मृतदेह पाणबुड्यांना आढळून आला. संबंधित मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास कोयनेश्‍वर मंदिरापासून काही अंतरावरच मीनाक्षीचा तर चारच्या सुमारास एका मुलाचा मृतदेह आढळला. रात्री उशिरापर्यंत दुसर्‍या मुलाचा नदीपात्रात शोध घेण्याचे काम सुरूच होते. याबाबतची नोंद कराड शहर पोलिसात झाली आहे.
कोवळ्या जीवांबरोबर नियतीची क्रूरचेष्टा
कोयना नदीपात्रात विवाहिता मनीषाने आपल्या पोटच्या साडेतीन वर्षाचा हर्ष, दोन वर्षाचा श्रवण व चार महिन्याच्या मुलीसह उडी घेतल्याने तिचे तर जीवन संपवलेच मात्र, या कोवळ्या जीवांनाही आपल्यासोबत नेल्याची घटना म्हणजे या कोवळ्या कळ्यांच्या बाबतीत नियतीने केलेली ही क्रूर चेष्टाच म्हणावी लागेल.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: