Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
म्हावशी फाटा येथे घराला आग
ऐक्य समूह
Wednesday, March 15, 2017 AT 11:08 AM (IST)
Tags: re1
साडेसहा लाख रुपयांचे नुकसान
5पाटण, दि. 14 : कराड-चिपळूण राज्यमार्गालगत म्हावशी गावच्या हद्दीत मंगळवार, दि. 14 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमा-रास म्हावशी फाटा येथे शॉर्टसर्किटने शेतघराला लागलेल्या आगीत 6 लाख 69 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत एक जनावर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान अग्निशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र आगीत शेतघरातील धान्याची पोती, सर्व साहित्य व जनावरांचा गोठा जळून खाक झाला आहे.
कराड-चिपळूण राज्यमार्गालगत म्हावशी गावच्या हद्दीत मोहन पांडुरंग घाडगे व प्रकाश पांडुरंग घाडगे यांचे स्वमालकीचे शेतघर आहे. या घरात जनावरांचा गोठा, 50 पोती जनावरांचे खाद्य, 25 पोती भात, सोयाबीन धान्य, जनावरांचा चारा असे साहित्य ठेवण्यात आले होते. मंगळवार, दि. 14 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान शॉर्टसर्किटने घराला आग लागली. या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. तसेच आगीत 70 हजार रोख रक्कम, 5 तोळे सोने, कडबाकुट्टी व दुधाची मशीन जळून खाक झाली.  ग्रामस्थांनी वेळीच जनावरे वाचवण्याचा प्रयत्न केला.  मात्र आगीत एक जर्सी गाय 70 टक्के भाजली आहे.
या आगीची माहिती ग्रामस्थांनी अग्निशामक दलास कळविल्यानंतर तत्काळ अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यामुळे आग आटोक्यात आणता आली.
ग्रामस्थांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. राज्यमार्गालगत घटनास्थळ असल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. आगीची माहिती मिळताच गावकामगार तलाठी जे. आय. आतार यांनी घटनास्थळी भेट देऊन आगीचा पंचनामा केला. आगीत  घाडगे कुटुंबीयांचे सर्व मिळून 6 लाख 69 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी घटनास्थळी भेट देऊन आगीची पाहणी केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: