Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वाई पंचायत समितीच्या सौ. रजनी भोसले सभापती, अनिल जगताप उपसभापती
ऐक्य समूह
Wednesday, March 15, 2017 AT 11:23 AM (IST)
Tags: re5
5वाई, दि. 14 ः येथील पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भुईंज गणातील सौ. रजनी सुधीर भोसले (भुईंज) यांची तर उपसभापतिपदी केंजळ गणातील अनिल बुवासाहेब जगताप (केंजळ) यांची बिनविरोध निवड झाली.
पिठासन अधिकारी तथा जिल्हा पुनर्वसन अधिकारी आरती भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निवडी घोषित करण्यात आल्या. त्यांना तहसीलदार अतुल म्हेत्रे, गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी सहकार्य केले. यावेळी पंचायत समितीचे सदस्य विक्रांत डोंगरे, मधुकर भोसले, सौ. सुनीता कांबळे, सौ. संगीता चव्हाण, सौ. ॠतुजा शिंदे व दिलीप ननावरे उपस्थित होते. सभापती व उपसभापतिपदासाठी सकाळी 11.30 पर्यंत नामनिर्देशन दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत सभापतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून सौ. रजनी भोसले यांनी तर काँग्रेसमधून सौ. ॠतुजा विराज शिंदे यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. उपसभापतिपदासाठी अनिल जगताप यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. तद्नंतर दुपारी 2 वाजता छाननीत तीनही अर्ज वैध ठरविण्यात आले. यावेळी नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी दिलेल्या मुदतीत सौ. ॠतुजा शिंदे यांनी आपला अर्ज माघारी घेतला. तद्नंतर पीठासन अधिकारी आरती भोसले यांनी सभापतिपदी सौ. रजनी भोसले व उपसभापतिपदी अनिल जगताप यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. त्यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचे अभिनंदन केले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील यांच्या हस्ते नूतन सभापती व उपसभापतींचा सत्कार करण्यात आला. सर्जेराव जाधव, प्रतापराव पवार, शशिकांत पिसाळ, दिलीप पिसाळ, शशिकांत पवार, प्रमोद शिंदे, सत्यजित वीर,  विजयसिंह नायकवडी, सौ. उमा बुलुंगे, सौ. शोभा सणस, महादेव मसकर, मदन भोसले, मोहन जाधव, शिवाजीराव पिसाळ, कांतीलाल पवार, अ‍ॅड. नीलेश डेरे, चंद्रकांत सणस, रमेश गायकवाड, प्रसाद देशमुख, राजेश शिंदे, विलास येवले, अतुल जगताप, किरण जाधव, दीपक बाबर यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला. दरम्यान, बाजार समितीमध्ये सकाळी आ. मकरंद पाटील, नितीन पाटील, प्रतापराव पवार व पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होऊन सभापती व उपसभापतिपदाच्या उमेदवार निश्‍चितीसाठी सदस्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर सभापतीसाठी सौ.भोसले तर उपसभापतिपदासाठी जगताप यांचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचे निश्‍चित करण्यात आले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: