Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्ह्यात पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा त्रिशंकू परिस्थितीमुळे कराड, खंडाळ्यात उपसभापतिपद सोडले
ऐक्य समूह
Wednesday, March 15, 2017 AT 11:06 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 14 : कराड पंचायत समितीसह सातारा जिल्ह्यातील सर्व म्हणजे 11 च्या 11 पंचायत समितीवर राष्ट्रवादीने झेंडा फडकवला आहे. कराड आणि खंडाळा या दोन पंचायत समितीत राष्ट्रवादीला उपसभापतिपद सोडावे लागले आहे. कराडमध्ये झालेल्या त्रिशंकू परिस्थितीत माजी आमदार विलासकाका उंडाळकर यांच्या कराड विकास आघाडीच्या सदस्यांनी राष्ट्रवादीस पाठिंबा दिला. त्यामुळे सभापतिपद राष्ट्रवादीकडे तर उपसभापतिपद कराड विकास आघाडीला देण्यात आले. खंडाळा तालुक्यात आ. मकरंद पाटील यांनी काँग्रेसला बरोबर घेऊन त्यांच्याच सदस्याला उपसभापतिपद दिले आहे.
सातारा जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली. पंचायत समितीच्या निवडणुकीत सातारा, जावली, महाबळेश्‍वर, वाई,  खंडाळा, फलटण, कोरेगाव, माण, खटाव, पाटण तालुक्यातील पंचायत समितीवर राष्ट्रवादीने बहुमत मिळावले. मात्र, कराड तालुक्यात राष्ट्रवादीला 7, काँग्रेसला4, भाजपला 6 आणि माजी आ. विलासकाका उंडाळकर यांच्या कराड विकास आघाडीस 7 पंचायत समिती गणात विजय मिळवला होता. त्यामुळे सभापती निवडीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावर आ. बाळासाहेब पाटील यांनी विलासकाकांना बरोबर घेऊन पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या शालन माळी, उपसभापतिपदी कराड विकास आघाडीच्या रमेश देशमुख निवड झाली. 
सातारा पंचायत समितीमध्ये आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाला 11 तर खा. उदयनराजे भोसले यांच्या गटाने भाजपला सोबत घेऊन 9 चे संख्याबळ जुळवले होते. मात्र, यावेळी झालेल्या निवडणुकीत सभापतिपदी राष्ट्रवादीचे मिलिंद कदम व उपसभापती जितेंद्र सावंत यांची 11 विरुद्ध 9 अशी निवड झाली. आ. शशिकांत शिंदे यांच्या कोरेगाव तालुक्यात सभापतिपद खुले झाल्याने राजाभाऊ जगदाळे यांची सभापती व उपसभापतिपदी संजय साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली. फलटण पंचायत समिती सभापतिपद महिलांसाठी राखीव असल्याने त्या ठिकाणी साखरवाडी गणातील रेश्मा भोसले यांची तर उपसभापतिपदी शिवरूपराजे खर्डेकर यांची निवड झाली. माण तालुक्यात शेखर गोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने काँग्रेसला धूळ चारली. सभापती अऩुसूचित जातीसाठी राखीव असल्याने रमेश पाटोळे हे एकमेव दावेदार होते. त्यांची बिनविरोध निवड झाली, तर उपसभापतिपदासाठी नितीन राजगे यांची निवड केली. खटाव तालुक्यात 12 जागांपैकी 8 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. सभापतिपद खुले असल्याने राष्ट्रवादींतर्गत चुरस वाढली होती. त्यामुळे सभापतिपदी संदीप मांडवे व उपसभापतिपदी कैलास घाडगे यांची निवड झाली. वाई तालुक्यात काँग्रेसला शह देऊन एकहाती सत्ता मिळवली. त्यात भुईंज गटात माजी आमदार मदन भोसले यांना शह देण्यासाठी सभापतिपदी सौ.रजनी भोसले यांची वर्णी लागली तर उपसभापतिपदी केंजळ गणातील ज्येष्ठ नेते अनिल जगताप यांची निवड करण्यात आली. जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात सतत संघर्ष सुरू असताना खंडाळा तालुक्यात आ. मकरंद पाटील यांनी सभापती व उपसभापती निवडीत काँग्रेसचा हात धरला. पंचायत समितीच्या 6 जागांपैकी 3 राष्ट्रवादी, 1 काँग्रेस व 2 अपक्ष असे पक्षीय बलाबल होते. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसची साथ घेऊन आ. पाटील यांनी खंडाळ्यात नवीन समीकरण तयार केले आहे. त्यामुळे सभापतिपदी मकरंद मोटे व उपसभापतिपदी काँग्रेसच्या वंदना धायगुडे यांची निवड करण्यात आली.
जावली पंचायत समितीमध्ये सर्व सहा जागा राष्ट्रवादीने जिंकल्या. सभापतिपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्याने अरुणा शिर्के यांची सभापतिपदी तर उपसभापतिपदी दत्तात्रय गावडे यांची वर्णी लागली. महाबळेश्‍वर तालुक्यात राष्ट्रवादीने 3 तर शिवसेनेने एका ठिकाणी विजय मिळवला होता. सभापतिपद खुले झाल्याने संजय गायकवाड व रूपाली राजपुरे यांच्यात चुरस निर्माण झाली होती. मात्र जिल्हा बँकेचे संचालक राजेश राजापुरे यांनी आपली ताकद वापरून पत्नी रूपाली राजपुरे यांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ घातली तर उपसभापतिपदी सौ. अंजना कदम यांची निवड झाली. पाटण तालुक्यात आ. शंभूराज देसाई गटाला शह देत सत्यजितसिंह पाटणकर यांनी पंचायत समितीवर राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळवून दिले होते. त्यामुळे सभापतिपदी उज्वला जाधव व उपसभापतिपदी राजाभाऊ शेलार यांची निवड करण्यात आली. कराड तालुक्यात राष्ट्रवादीला 7, उंडाळकर गटास 7, भाजपला 6 व काँग्रेसला 4 जागा असा संमिश्र कौल मिळाला होता. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी माजी आ. विलासकाका उंडाळकर यांच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष होते. ते भाजपचे अतुल भोसले की राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील यापैकी कोणाला साथ देणार त्यावर पंचायत समितीच्या सत्तेचे चित्र स्पष्ट होणार होते. अखेर उंडाळकरांच्या 7 सदस्यांनी राष्ट्रवादीला साथ दिली. त्यामुळे सभापतिपदी राष्ट्रवादीच्या शालन माळी व उपसभापतिपदी कराड विकास आघाडीच्या रमेश देशमुख यांची निवड झाली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: