Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अपेक्षेप्रमाणे मिलिंद कदम सभापती, जितेंद्र सावंत उपसभापती
ऐक्य समूह
Wednesday, March 15, 2017 AT 11:07 AM (IST)
Tags: lo2
साविआ व भाजप एकत्र; आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे वर्चस्व सिद्ध
5सातारा, दि.14 : सातारा पंचायत समितीच्या सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे मिलिंद कदम तर उपसभापतिपदी जितेंद्र सावंत विजयी झाले. त्यांनी या निवडणुकीत खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीचे हणमंत गुरव आणि रामदास साळुंखे यांचा पराभव केला. या निवडणुकीतून पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे म्हणजेच पर्यायाने आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वर्चस्व सिद्ध झाले.
दरम्यान, नवनिर्वाचित सभापती, उप-सभापतींचा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सत्कार केला. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचा विजय असो या घोषणनेने आणि फटाक्यांच्या आतषबाजीने सातारा पंचायत समितीचा परिसर दणाणून गेला.
सातारा पंचायत समितीच्या निवडणुकीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या नेतृत्वाखाली 20 पैकी 11 जागा निवडून आल्या आहेत. खा. उदयनराजे यांनी सातारा तालुक्यात काँग्रेस, भाजप या पक्षांबरोबर आघाडी करून निवडणूक लढवली  होती, तरीही त्यांच्या आघाडीला केवळ 6 जागांवरच समाधान मानावे लागले तर भाजपला 3 जागा मिळाल्या.  सभापती निवडीत भाजप व सातारा विकास आघाडी एकत्र आले तरीही त्यांचे संख्याबळ 9  झाले. त्यामुळे त्यांच्या दोन्ही उमेदवारांचा 2 मतांनी पराभव झाला.
सातारा पंचायत समितीच्या सभागृहात  मंगळवारी सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणुकीसाठी प्रांतधिकारी सौ. स्वाती देशमुख यांनी विशेष सभा घेतली. सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीतून सभापतिपदासाठी मिलिंद कदम, छाया कुंभार तर उपसभापतिपदासाठी जितेंद्र सावंत यांनी अर्ज दाखल केले होते. त्यांच्या विरोधात हणमंत गुरव, रामदास साळुंखे यांनी अर्ज दाखल केले होते. राष्ट्रवादीच्या छाया कुंभार यांनी 2.30 वाजता सभापतिपदाचा अर्ज माघारी घेतल्यानंतर दोन्ही पदांसाठी  निवडणूक झाली. निवडणुकीत सभापती मिलिंद कदम यांना 11 तर विरोधी हणमंत गुरव यांना 9 मते मिळाली. उपसभापतिपदाच्या निवडणुकीतही जितेंद्र सावंत यांना 11 तर विरोधी रामदास साळुंखे यांना 9 मते मिळाली.  त्यानंतर सभापतिपदी मिलिंद कदम तर उपसभापतिपदी जितेंद्र सावंत  हे निवडून आल्याचे पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी स्वाती देशमुख यांनी जाहीर केले. नवनिर्वाचित सभापती, उपसभापतींचे स्वागत पीठासन अधिकारी सौ. देशमुख व सदस्यांनी केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: