Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कराड पंचायत समिती सभापतिपदी सौ. माळी तर उपसभापतिपदी देशमुख
ऐक्य समूह
Wednesday, March 15, 2017 AT 11:22 AM (IST)
Tags: re3
5कराड, दि. 14 : कराड तालुका पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीकडे संपूर्ण जिल्ह्यांचे लक्ष लागले असताना येथे पुन्हा राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब पाटील व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर गट सत्तेत आले. सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. शालन माळी (किवळ) यांची तर उंडाळकर गटाच्या कराड तालुका विकास आघाडीचे रमेश देशमुख (कोळेवाडी) यांची उपसभापतिपदी  निवड झाली. भाजपचे डॉ. भोसले गट व उंडाळकर गट या निवडणुकीत एकत्र न आल्याने त्यांच्या मैत्रिपर्वाचा अस्त झाल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले.
कराड तालुका पंचायत समितीच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात सभापती व उपसभापतिपदासाठी निवडीचा कार्यक्रम मंगळवारी 11 वाजल्यापासून सुरू झाला. पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी किशोर पवार  व गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांच्या उपस्थितीत सकाळी 11 ते 11.30 या दरम्यान सभापती व उपसभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. यावेळी ओबीसी महिला आरक्षण असलेल्या सभापतिपदासाठी राष्ट्रवादीच्या सौ. शालन गणपती माळी (किवळ) व भाजपच्या अर्चना संजय गायकवाड (कार्वे) हे दोन अर्ज दाखल झाले. तर उपसभापतिपदासाठी कराड तालुका विकास आघाडीचे रमेश देशमुख (कोळे), भाजपच्या श्रीमती शुभांगी संजय पाटील (आटके) आणि काँग्रेसचे नामदेव पाटील (वारुंजी) हे तीन अर्ज दाखल झाले. दुपारी 2 वाजता पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी किशोर पवार यांच्या अध्यक्षतेखालील प्रथम सभेत  उमेदवारी अर्जांची छाननी होवून सर्व अर्ज वैध ठरले. त्यानंतर उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या मुदतीत भाजपच्या अर्चना गायकवाड यांनी सभापतिपदासाठी  आपला अर्ज माघार घेतला. त्याचबरोबर भाजपच्या श्रीमती शुभांगी पाटील यांनी व काँग्रेसचे नामदेव पाटील यांनी आपले उपसभापतिपदाचे उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सभापती व उपसभापतिपदासाठी एक-एकच उमेदवारी अर्ज राहिले. उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर सभागृहात सभापतिपदी शालन माळी यांनी तर उपसभापतिपदी रमेश देशमुख यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी  किशोर पवार यांनी जाहीर केले.
दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सभापती व उपसभापतिपदाच्या निवडी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करुन जल्लोष व्यक्त केला. दरम्यान, नूतन सभापती शालन माळी, उपसभापती रमेश देशमुख यांनी इतर पदाधिकार्‍यांसमवेत स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर जावून अभिवादन केले. त्यानंतर आदरणीय स्व. पी. डी. पाटीलसाहेब पाटील यांच्या निवासस्थानी जावून त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
24 गणांच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब पाटील यांच्या गटाचे 7 व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या कराड तालुका विकास आघाडीला 7 जागा, भाजपाचे डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले व मदनराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला 6 तर माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व आ. आनंदराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला 4 जागा असा जनतेने समिश्र कौल दिला होता.
कराड तालुका पंचायत समितीसाठीच्या सभापतिपदासाठी अडीच वर्षांसाठी ओबीसी महिला हे आरक्षण असताना या ओबीसी महिला आरक्षणातून राष्ट्रवादीच्या शालन गणपती माळी (किवळ), माजी आ. विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या कराड तालुका विकास आघाडीच्या फरिदा मन्सूर इनामदार (येळगाव) व भाजपच्या अर्चना संजय गायकवाड (कार्वे) या निवडून आल्या. गेल्या पाच वर्षांप्रमाणेच आताही आ. बाळासाहेब पाटील व विलासराव पाटील-उंडाळकर हे पंचायत समितीच्या सत्तेत एकत्र येणार अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. परंतु, गेल्या पाच वर्षांत आ. बाळासाहेब पाटील यांच्या गटाकडेच देवराज पाटील यांच्या रुपाने सलग पाच वर्षे सभापतिपद राहिले होते. त्यामुळे यावेळी माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर गटाला सभापतिपदाची संधी मिळेल, असे मानले जात होते. मात्र, आ. बाळासाहेब पाटील व उंडाळकर गटांमध्ये सव्वा-सव्वा वर्षांसाठी सभापतिपदाची संधी घेण्याचा निर्णय झाला. त्यात आ. बाळसाहेब पाटील यांच्या गटाला पहिल्या सव्वा वर्षांसाठी संधी मिळून शालन गणपती माळी (किवळ) यांची वर्णी लागली.
भविष्यातील राजकारण विचारात
घेवून निर्णय : आ. पाटील
दरम्यान, कराड पंचायत समिती पदाधिकारी निवडीत उंडाळकर गटाशी केलेल्या हातमिळवणीच्या पार्श्‍वभूमीवर आ. बाळासाहेब पाटील यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असता त्यांनी भविष्यातील राजकारण विचारात घेवून काही निर्णय घ्यावे लागतात, अशी प्रतिक्रिया दिली. आ. पाटील म्हणाले, कराड तालुका राज्यात सर्वाधिक मोठा तालुका आहे. पंचायत समितीला चोवीस सदस्य आहेत. स्व. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा असल्याने राजकीयदृष्ट्या कराड पंचायत समितीला विशेष महत्त्व आहे. पंचायत समितीत यावेळी कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. राष्ट्रवादी 7, विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या नेतृत्वाखालील तालुका विकास आघाडीला 7, भाजपला 6 व काँग्रेसला 4 जागा मिळाल्या.
भाजप व काँग्रेस यांचे प्रस्ताव आले होते. मात्र त्यांच्यासोबत जाणे योग्य वाटले नाही. भविष्यातील राजकारण डोळ्यासमोर ठेवून काही निर्णय घ्यावे लागतात, असेही आ. पाटील म्हणाले. भविष्यात दोन्ही गटाकडून चांगले काम होईल. भाजप व काँग्रेसने कराड तालुक्यात पंचायत समितीच्या माध्यमातून होणार्‍या चांगल्या कामासाठी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन आ. पाटील यांनी केले.
जिल्ह्यात सर्व अकरा ठिकाणी राष्ट्रवादीचा सभापती झाला आहे. जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील वर्चस्व कायम राहिले आहे. निवडणुकी दरम्यान कराड दक्षिणमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. या प्रक्रियेत मी सहभागी नव्हतो. त्यात अविनाश मोहिते यांना अडकविण्याचा प्रयत्न झाला, त्याचाही परिणाम झाला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिणमध्ये लक्ष घालण्याऐवजी कराड उत्तरमध्येच तेही कोपर्डे परिसरातच अधिक लक्ष घातले. त्यामागे त्यांचा हेतू काय? काय माहिती. त्यामुळे आमची हक्काची कोपर्डे हवेली येथील जागा गेली. शिवाय भाजप उमेदवारांमुळे मत विभागणीचाही आम्हाला फटका बसला, याबद्दल आ. बाळासाहेब पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: